सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक ट्विस्ट आला असून काही दिवसांपूर्वी कारखान्याचे संचालक पदाचा राजीनामा दिलेल्या भरत शहा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शहा आणि पाटील यांच्यात बेबनाव असल्याचा राष्ट्रवादीने जो देखावा मांडला होता, तो आजच्या नामनिर्देशनपत्राने उध्वस्त झाला आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऐनवेळी पॅनल करणार नसल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले. खरेतर पॅनल करायचा नसता, तर राष्ट्रवादीला महिन्यापूर्वीच ते जाहीर करता आले असते, परंतु राष्ट्रवादीने अचानक आणि आयत्या क्षणी निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे कसे काय जाहीर केले असा संभ्रम खुर्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही आहे.
अर्थात यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी भाजपने राष्ट्रवादीला आणखी एक दणका दिला. काही दिवसांपूर्वी शहा आणि पाटील कुटुंबात दुरावा असल्याची पद्धतशीर पेरणी राष्ट्रवादीकडून झाली होती. अर्थात त्याला कारणही तसे होते. भरत शहा यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील जाऊन शहा कुटुंबीयांची भेट घेतली होती.
मात्र आज भरत शहा यांनी इंदापूरच्या गटातून ऊस उत्पादक सभासदांच्या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने गेल्या काही दिवसापासून जी अटकळ बांधली जात होती ती आता तरी संपुष्टात आली आहे. आणि राष्ट्रवादीने इंदापूर शहरातील नगर परिषदेसाठी गोळाबेरीज सुरू करण्याचे काम केले होते, त्याला फार मोठा दणका बसला आहे.
आज भरत शहा यांचा अर्ज दाखल करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माऊली चवरे, एडवोकेट कृष्णाजी यादव, महेंद्र रेडके, सुनील तळेकर, शकीलभाई सय्यद, रघुनाथ राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.