तहसीलदार, टोल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संवेदनशील माणूसकीने स्नेहल पवार भारावल्या..!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
हि कहाणी आहे वेळे तालुका वाई येथील स्नेहल पवार या महिलेची आणि तिच्या तीन वर्षाच्या अर्णव या मुलाची…! समाज संवेदनशील असला की, साऱ्याच संकटाच्या गाठी आपोआप सुटतात; आणि त्या फक्त सुटत नाहीत, तर नव्या ऋणानुबंधाची नाती निर्माण करतात..! असाच प्रत्यय स्नेहल पवार यांना आला आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची शस्त्रक्रिया अगदी सहजरीत्या शक्य झाली..!
मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे समाजाच्या संवेदनशीलतेने एका कुटुंबावर केलेल्या सामाजिक दातृत्वाची मोठी प्रचिती होती… वाईचे तहसीलदार रणजित भोसले , आनेवाडी टोलनाक्यावरील व्यवस्थापक रघुवीर सिंह, रिलायन्स कंपनीचे अधिकारी संकेत गांधी, टोल नाक्यावरील कर्मचारी पांडुरंग पवार, अविनाश फरांदे, कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्नेहल पवार यांच्या तीन वर्षीय मुलावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ही गोष्ट छोटी त्यांच्यासाठी डोंगराएवढी ठरली..!
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्नेहल पवार या आनेवाडी टोल नाक्यावर काम करतात. त्यांना तीन वर्षाचा अर्णव हा मुलगा असून काही दिवसांपूर्वी त्याला मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. दवाखान्यात दाखवल्यानंतर त्याच्या मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी निदान केले. त्यासाठी खासगी दवाखान्यात लाखो रुपयांचा खर्च येईल अशी माहिती मिळाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
स्नेहल पवार यांची चिंता लक्षात घेऊन टोल नाक्यावरील कर्मचारी पांडुरंग पवार, अविनाश फरांदे, कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आपल्याला या संकटात हातभार लावायचा आहे आणि मदत करायचे आहे असे ठरवले.
त्यांनी काही रक्कम जमा केली, मात्र ती रक्कम अपुरी असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बाब टोलनाक्यावरील व्यवस्थापक रघुवीर सिंह यांच्या कानावर घातली आणि रिलायन्स कंपनीचे मॅनेजर संकेत गांधी यांना सांगितली. त्यांनीही यामध्ये त्यांच्याकडील रक्कम घातली, मात्र तरीही या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या मुदतीपर्यंत पोहचता येत नव्हते.
अखेर हे कर्मचारी वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना भेटले. रणजित भोसले यांनी परिस्थिती लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सांगली येथील डॉक्टरांशी संपर्क साधला व महात्मा फुले जीवन आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया करता येईल का याविषयी विचारणा केली व तेथील दवाखान्यानेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.