अमोल होरणे : महान्युज लाईव्ह
नगर : खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा(कल्याण -विशाखापट्टणम NH61 – खरवंडी कासार -लोहा नांदेड)पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. नुकत्याच आलेल्या महापुराचा या पुलाला फटका बसला असून पुलाच्या दोन्ही बाजूकडील आरसीसी सुरक्षा कठडेही तुटून गेले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.
स्थानिकांना या पुलावरून रात्री-अपरात्री प्रवास करताना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
खरवंडी कासारच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहेत अहमदनगर -बीड जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग आहे. पुलाला ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला. बांधतानाच हा पुल अरूंद व अतिशय ठेंगणा बांधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात किमान चार- पाच वेळा तरी पुराचे पाणी या पुलावरून वाहते.
पाण्याच्या वेगवान प्रवाहाने दरवर्षीच या पुलावर खड्डे पडतात. पुल अरूंद असल्याने दोन वाहनांना एकमेकांना ओलांडताना सावधगिरीनेच ओलांडावे लागते. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन पुलावरून काढणे तारेवरची कसरत ठरते. वारंवार पुर गेल्याने हा पुल कमकुवतसुद्धा झाला आहे.
विशेष म्हणजे पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने पुलाच्या कडेला कठडे लावले जात नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष जराशेही विचलीत झाल्यास आडकाठी नसल्याने वाहन सरळ नदीत पडू शकते. आतापर्यंत अनेक दोनचाकी व चारचाकी वाहने या पुलावरून खाली पडून अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत.
मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे व त्याला कठडे लावण्याचे काम तात्काळ केले जात नाही. या पुलावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील यांनी उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पाथर्डी यांना या बाबतचे निवेदन दिले होते. संबधित प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी खरवंडी आणि परिसरातील नागरिकांतून होत आहे .
दुर्घटनेची शक्यता…
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग (बायपास) 61 (NH61) वरून खरवंडी कासार – नवगण राजुरी – बीड- नांदेड- लोहा या राष्ट्रीय महामार्गाकडे जाताना हा पूल लागतो. या पुलाकडे जाताना तीव्र उतार व धोकादायक वळण असून या पुलावरून प्रवास करताना दुचाकी धारकांना मोठी कसरत करावी लागते. रात्री- अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दुर्घटनेची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग घेणार?
खरवंडी कासार मधील पुलाच्या दोन्ही बाजूकडील आरसीसी सुरक्षा कठडेही पुराच्या पाण्यामुळे तुटून गेले आहे. हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असताना सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही काळजी घेतलेली नाही. त्यामुळे सुरक्षेच्या अभावी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.