पुणे : महान्यूज लाईव्ह
तामिळनाडूतील एका मोलकरीण महिलेला वानवडी पोलिसांनी तिच्या तामीळनाडू येथील घरातून अटक केली. का? तर तिने पुण्यातील कोरेगाव पार्क, लष्कर, वानवडी, कोंढवा, खडक, समर्थनगर, येरवडा, बंडगार्डन आदी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये तब्बल अकरा चोऱ्या केल्या.
घरकाम करताना घरातील व्यक्तींना चहापाणी तसेच जेवणात गुंगीचे औषध घालून त्यांचे मौल्यवान ऐवज ही महिला चोरायची. तिने या चोऱ्या मधून तब्बल 60 लाख 93 हजार रुपये चोरले. पोलिसांनी त्यांच्या घरातून ही रक्कम जप्त केली आहे.
शांती चंद्रन (वय 43, राहणार अन्नाईनगर वेग्निकल तिरूलअन्नमलाई तामिळनाडू) असं या महिलेचे नाव आहे. कोणत्याही नवीन ठिकाणी काम केल्यानंतर ती चार ते पाच दिवस काम करायची. त्यानंतर घरातील व्यक्तीचा विश्वास संपादन करून गुंगीचे औषध खाद्यपदार्थांमध्ये घालून घरातील दागिने चोरून न्यायची. मधुबाला प्रवीण सेठीया या महिलेच्या तक्रारीवरून तिला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेठीया यांच्या घरी काम करताना शांती हिने कपाटात ठेवलेले दहा लाख 52 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. न्यायालयाने तिला 24 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.