इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी दाखल केला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, ॲड.कृष्णाजी यादव, कांतीलाल झगडे, देवराज जाधव, बाळासाहेब पाटील, अशोक इजगुडे, शकील सय्यद, कैलास कदम, बापू जामदार, रंजना शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.इच्छुक कार्यकर्त्यांमधून या निवडणुकीसाठी तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्षम कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे हर्षवर्धन पाटील यांचे नियोजन असल्याचे समजते.
राज्यातील साखर उद्योग अडचणीत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याची निवडणूक होत आहे. सध्या कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना अडचणीतून बाहेर येत असून राज्यातील पहिल्या टॉप टेन कारखान्यांमध्ये कर्मयोगी कारखान्याचा समावेश करण्याची क्षमता हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वामध्ये असल्याचा विश्वास सभासदांमधून व्यक्त केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.24) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.