नगर : महान्यूज लाईव्ह
नगर येथील यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ बोठे याचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
30 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे-नगर रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. रेखा जरे यांची हत्या बाळ बोठे याने सुपारी देऊन केली होती असे तपासात पुढे आले होते. त्यानंतर बाळ बोठे याला शिताफीने पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले होते. त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
त्याच्या वकिलांनी जामिनाचा अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सरकारच्या बाजूने एडवोकेट उमेशचन्द्र यादव पाटील व एडवोकेट सचिन पटेकर यांनी बाजू मांडली, तर बोठे याच्या बाजूने एडवोकेट महेश तवले यांनी बाजू मांडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने बोठे याला जामीन दिला, तर तो पुन्हा फरार होऊ शकतो, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज फेटाळला.