पुणे : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेताना पुण्यातील साखर संकुलातील जागेत जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. येत्या तीन वर्षात हे साखर संग्रहालय उभारले जाणार आहे.
या नियोजित साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक समिती आणि सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी कार्यकारी समिती स्थापण्यात सरकारने मंजुरी दिली.
हे जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय 40 कोटी रुपये खर्चाचे असणार असून, त्यासाठी सरकार साखर आयुक्तालयास तीन वर्षात निधी उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान आज झालेल्या बैठकीत दोन साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील राजगड आणि सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना या दोन कारखान्यांना 28 कोटी रुपयांची कामे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.