अमोल होरणे : महान्यूज लाईव्ह
अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच (७४ मीटर) भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची सध्या यात्रा निघाली असून या यात्रेला उत्तर भारतातही मोठा प्रतिसाद मिळाला.
नगर जिल्ह्यातील शिवपट्टण अर्थात खर्डा या किल्ल्याच्या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाला उजळणी देण्याचा आणि नवी ओळख देण्याचा रोहित पवार यांचा हा आगळावेगळा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून सन 1674 च्या राज्याभिषेकासाठी 74
मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज, अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांनी उभे केलेले रयतेचे राज्य म्हणून 18 टन वजनाचे खांब आणि 90 किलो चा ध्वज स्वराज्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.
देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असणार आहे. या ध्वजाच्या आरोहणापूर्वी देशभरातील महत्त्वाच्या संत पीठे ऐतिहासिक स्थळांना ही यात्रा भेट देत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी 12 हजार किमीचा प्रवास सध्या सुरू आहे.
यामध्ये श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले. या ध्वज यात्रेचे उत्तर भारतात जंगी स्वागत झाले. बोधगया आणि आयोध्या याठिकाणी यात्रा संपन्न झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी देखील याचे दर्शन घेतले, त्याच बरोबर या दोन्ही यात्रेला शुभेच्छा दिल्या. विशेषता आयोध्या येथे आमदार रोहित पवार येतील, म्हणून त्यांच्या स्वागताची देखील तयारी करण्यात आली होती.
‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला, त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या खर्डा येथील किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ( ता.१५)या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
या स्वराज्य ध्वज यात्रेची सुरुवात होताना खरवंडी कासार येथेही उत्साहात स्वागत करून पूजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे ,नगरसेवक चाँद मणियार, राजेंद्र जगताप,भगवानगड प्रेस क्लबचे अध्यक्ष कृष्णनाथ अंदुरे, सतीश जगताप, दैनिक सकाळचे अमोल होरणे, दादासाहेब खेडकर, अशोक आव्हाड, सतीश जाधव, शैलेंद्र जायभाये, दीपक देशमुख, सुशील जगताप ,संदीप देशमुख, योगेश अंदुरे, महादेव जगताप, भाऊसाहेब अंदुरे , शुभम जायभाये, विशाल कोळपकर, गणेश लोंदे, प्रदीप पाथरकर तसेच शिवराजे, स्वराज्य, राजयोद्धा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते .