भिगवण : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर ३ गावात आणि परिसरात लाळखुरकत रोगाची साथ आली असून एकाच दिवशी १२ जनावरांचा मृत्यू झाला. आठवड्यातील जनावरांच्या मृत्यूचा आकडा २० पेक्षा अधिक झाला आहे.
मंगळवारी ( दि.२१ रोजी) गणेश जगताप यांच्या गोठ्यातील तब्बल १२ गायी लाळखुरकत रोगाने मृत्युमुखी पडल्या. त्यापूर्वी हनुमंत जगताप यांच्या तीन, गजानन जगताप यांच्या तीन, लाला गलांडे यांच्या दोन गाया मृत्युमुखी पडल्याचे समजते. दरम्यान डाळज व परिसरात जवळपास १५३ जनावरांना लाळ खुरकत रोगाची लागण झाल्याची माहिती आहे.
अर्थात लागण झालेल्या शंभरहून अधिक गाई बऱ्या झाल्या आहेत. या घटनेमुळे गोपालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. शासनाने याची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेनंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, डॉ. भगतसिंग कदम, सुनील लहाने, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर आदींनी डाळजला भेट देऊन पाहणी केली.