भिगवण : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील अकोले येथे मुलगा होत नाही, त्यातच पती बाहेरख्याली असल्याने त्याच्या अनैतिक संबंध व सततच्या मानसिक व शारिरीक छळास कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने तिच्या ३ वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने इंदापूर तालुक्याला हादरा बसला.
यामध्ये, मनिषा महादेव दराडे (वय . 27 वर्षे ) असे या विवाहितेचे नाव असून तिने तिची लहान मुलगी कु.भाग्यश्री महादेव दराडे (वय .3 वर्षे) हिच्या सोबत घेवून विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि, २१) रोजी उघडकीस आली.
याबाबतची फिर्याद विवाहितेचे वडील नवनाथ विठोबा खैरे (वय .65 ) रा. दादेगाव ता.आष्टी जि. बीड यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती महादेव चंद्रकांत दराडे आणि सौ. रुपाली शरद खैरे (दोघे रा . अकोले , ता.इंदापुर , जि.पुणे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, मनिषा हिला मुलगा होत नाही. तुला सर्व मुलीच आहेत. आम्ही तुला सोडचिठ्ठी देणार आहे. असे म्हणून तिला वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली जात होती. तिचा मानसिक व शारिरीक छळ होत होता. पती महादेव दराडेच्या अनैतिक संबंधासही कंटाळुन मनिषा महादेव दराडे हिने तिची लहान मुलगी कु.भाग्यश्री महादेव दराडे हिच्यासह अकोले येथील अशोक यशवंत गायकवाड यांचे विहीरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास फौजदार दडस पाटील हे करीत आहेत .