माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २१ – अनेकवेळा समजावून देखील उच्चशिक्षित तरुणीला वारंवार छेडछाड आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या एका तरुणावर राजगड पोलिसांनी दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पीडित तरुणीला न्याय मिळणार का? असा सवाल महिला वर्गातून होत आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निखिल दत्तात्रय गाडे याच्यावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. २० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील चौकात घडली आहे. याबाबत तरुणीने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याच तरुणाने या फिर्यादी तरूणीचा गेल्या काही महिन्यांपूर्वी विनयभंग केला होता. त्यामुळे निखीलवर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी तरुणी ही तिच्या आई समवेत शेतात जात असताना निखिलने भररस्त्यात तरुणीचे हात धरून तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे, तुझे काय आहे ते मला आता सांग असे म्हणत त्याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून निखिलने फिर्यादीचा हात धरला.
तो हात तरुणीच्या आईने सोडविला, तरी देखील निखिलने शिवीगाळ करत फिर्यादीच्या आई आणि भावाला मारहाण करून फिर्यादी सोबत लग्न करणार आहे, जर माझ्याशी लग्न झाले नाही तर तुम्हाला अवघड जाईल’ धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी गाडे याने यापूर्वीदेखील तरुणीचा वारंवार पाठलाग करून छेडछाड करून विनयभंग बाबत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार जगदीश शिरसाट करत आहेत.