राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी बोरीपार्धी – चौफुला येथील परशुराम गडधे युवा मंचाचा प्रमुख परशुराम उर्फ आबा केरू गडधे (वय 21 ) याला यवत पोलीसांनी अटक केले आहे. त्यास दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवासांची म्हणजे 24 संप्टेबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. पाटस येथे 4 जुलै 2021 रोजी शिवम संतोष शितकल (वय 23) व गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस, अंबिकानगर, दौंड.जि.पुणे,) या दोन युवकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या दुहेरी हत्याकांडाने दौंड तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात संताप व्यक्त केला गेला होता. पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २२ रा.पाटस, तामखडा ता. दौंड जि.पुणे ) महेश मारुती टुले (वय २० रा.पाटस, तामखडा ता. दौंड जि. पुणे ), युवराज रामदास शिंदे (वय १९ रा. गिरीम, मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे ), गहिनीनाथ बबन माने (वय १९ रा. गिरीम, राघोबानगर ता. दौंड जि. पुणे ) या चार आरोपींना बारा तासांच्या आत अटक केले होते.
सध्या हे चारही आरोपी जेलमध्ये आहेत. या प्रकरणी या गुन्हयात आरोपींना मदत केल्याप्रकरणी सुनिल मुरलीधर जाधव ( रा. गोजुबावी ता. बारामती. जि.पुणे ) यास यवत पोलीसांनी अटक केली होती. या हत्याकांडात पै.परशुराम युवा मंच या संघटनेचा प्रमुख परशुराम उर्फ आबा केरू गडधे (वय 21 रा. बोरीपार्धी – चौफुला ता. दौंड जि.पुणे) हा ही घटनेनंतर फरार झाला होता.
परशुराम गडधे याने आरोपींना हा गुन्हा करण्यासाठी चेथावणी दिली होती. तसेच आरोपींना फरार करण्यास मदत केली होती. या हत्याकांडाचा तो मुख्य सुत्रधार असल्याचा संशय पोलीसांना आहे. यामुळे यवत पोलीसांनी परशुराम गडधे याला सोमवारी (दि. 20) अटक करून दौंड न्यायालयात हजर केले.
दौंड न्यायालयाने या आरोपीला शुक्रवार (दि.24 ) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, परशुराम गडधे याला या हत्याकांडातून सुखरूप वाचवण्यासाठी दौंड तालुक्यातील दोन बड्या राजकीय नेत्यांचा दबाव पोलिसांवर होता. तसेच राहु बेटातील एका कुख्यात गुंडाचा वरदहस्त असल्याने तो फरार होता.
या हत्याकांडात गुंड परशुराम गडधे याला अटक करण्याच्या मागणीसाठी जयमल्हार क्रांती संघटनेने दौंड तहसीदार कार्यालयावर मोर्चा ही काढला होता. गुंड परशुराम गडधे याने स्वतःच्या नावावर पै.परशुराम गडधे युवा मंच स्थापन करून चौफुला, बोरीपार्धी, यवत, वरवंड, पाटस, कुरकुंभ परिसरात टोळ्या तयार करून दहशत निर्माण केली होती.
काही दिवसांपुर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल नाक्यावर शंभर दिडशेच्या जमावाने टोल नाक्यावरील कर्मचारांना फिल्मी स्टाईलने लाठ्याकाठ्यांनी माराहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे समर्थन करीत सोशल मिडीयावर या गुन्ह्याची जाहीर कबुलीही या मंचाने दिली होती.
पाटस,चौफुला परिसरात बेकायदा वाळू,माती आणि मुरूम उपसा त्याचे समर्थक करीत होते. या परिसरात जमाव जमवुन दहशत निर्माण करणे यापुवी अनेक वेळा या मंचाच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. या दुहेरी हत्यांकाडात पोलीसांनी गुंड परशुराम गडधेला अटक केल्याने पोलीसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले जात आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.आभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार हे पुढील तपास करीत आहेत.