संपादकीय
पत्रकारीता हा समृध्द लोकशाहीचा चौथा स्तंभ ओळखला जातो. या पत्रकारीतेने अनेक सुवर्णक्षण अनुभवले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आजही कोणी विसरलेले नाही. लोकजागृतीचा वसा व मक्ता घेतलेल्या या पत्रकारीतेची आठ दशकातील वाटचाल स्पृहणीय होती. जागतिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर खरेतर जागतिक निर्गंतुवणूकीचे प्रमाण वाढल्यानंतर पत्रकारीतेला खऱ्या अर्थाने वाव मिळाला.. मात्र मागील चार ते पाच वर्षात या पत्रकारीतेचा गळा घोटला जातोय.. अनेक कारणांमुळे आता माध्यमकर्मींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली जाऊ लागली असून फक्त चार वर्षात हे प्रमाण ५६ टक्क्यांवर घसरले आहे. तर पाच वर्षात ही टक्केवारी ७८ टक्क्यांवर घसरली आहे. म्हणजे ७८ टक्के माध्यमकर्मींच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
सीएमआयई या माध्यम क्षेत्रातील घडामोडींवर सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या स्त्रोतानुसार सन २०१६-१७ मध्ये जिथे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ८ लाख ३३ हजार ११५ पत्रकार कार्यरत होते. इतर माध्यमांतून मिळून हा आकडा १०.३० लाख एवढा होता. तो सन २०२० -२१ मध्ये दुसऱ्या लाटेची सुरवात होताच अवघ्या ३ लाख ६६ हजार ७२३ वर घसरला. आणि आता हा आकडा २.३ लाखांवर पोचला आहे. हा घसरणारा टक्का तब्बल ७८ टक्क्यांचा आहे.
नोव्हेंबर १८ पासूनच या घसरत्या संख्येला सुरवात झाली. त्यात कोरोनाने कंबरडे मोडले. प्रिंट मिडियाची भयावह अवस्था कोरोनाने करून ठेवली. वृत्तपत्रे खपण्याचे प्रमाण अवघ्या ३० ते ३५ टक्क्यांवर आणून ठेवले. त्यात दुसऱ्या लाटेनेही तडाखा दिला आणि अनेक वृत्तपत्र कंपन्यांनी, विशेषतः साखळी वृत्तपत्रांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना डच्चू दिला. अनेक ठिकाणची कार्यालये बंद केली.
भारतात सन २००० च्या दरम्यान जागतिकीकरणाचे वारे अधिकच जोरात वाहू लागले आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचा प्रवेश झाला. तोपर्यंत प्रिंट मिडिया म्हणजे वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांचा पगडा होता. मात्र जशी इलेक्ट्रॉनिक मिडियाने माध्यमक्षेत्रात पाऊल टाकले. वृत्तपत्रांनी ग्लोबल टु लोकल होण्यास सुरवात केली. अगदी गावपातळीवरच्या बातम्या्ंसाठी विशेष पुरवण्या सुरू केल्या, तेथून वृत्तपत्रे गावागावात पोचली, मात्र या झटापटीत गावातील बातम्यांचा आत्मा असलेली त्याकाळातील साप्ताहिके गुदमरली.
जेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडिया आला, तेव्हा प्रिंट मिडिया संपणार अशी हाकाटी सुरू झाली. मात्र सुदैवाने तसे घडले नाही. उलट मुद्रीत माध्यमांचा खप वाढला, वाचकही वाढले. जागतिक स्तरावर सन २००३ मधील स्थिती अशी होती की, जेव्हा तिथे इलेक्ट्रॉनिक मिडिया वाढला, तसतशी वृत्तपत्रे गटांगळ्या खात गेली. काही नामशेषही झाली. भारतातही तसे होईल असा अंदाज होता. मात्र हा अंदाज वाचकांनी चुकवला.
मात्र सन २०१२ नंतर जसे सोशल मिडीयाचे वारे आले आणि सन २०१४ मध्ये या मिडीयाचा सर्वाधिक वापर राजकारणात झाला, तसे प्रिंट मिडियाच्या अस्ताची सुरवात झाली. झटपट बातम्या, व्हिडीओ यांमुळे सोशल मिडिया सर्वाधिक लोकप्रिय झाला. वाड्यावस्त्यांवर, दुर्गम भागात या बातम्या पोचल्या आणि प्रिंट मिडियाची गरज काहीशी कमी होत गेली. फक्त बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी मात्र मुद्रीत माध्यमांवरच लोक अवलंबून राहीले, तो काहीसा दिलासा होता.
सोशल मिडियाने सुरवात केली आणि प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमधून प्रत्येकाला पत्रकार बनवले. मग इतरांची गरजच उरली नाही. आपल्या भागातील घटना आपल्या परिसरात सर्व ठिकाणी एकदम वेगाने पसरते यावर विश्वास ठेवतानाच एखादी गंभीर, भयानक, महत्वाची घटना वेगाने राज्यभर, देशभर पसरतेय हे लक्षात येताच सोशल मिडीयाचे महत्व आपोआप वाढले.
माध्यमांना सर्वाधिक मोठा दणका कोरोनाच्या पहिल्या लाटेने दिला. सुरवातीच्या काळात वृत्तपत्राने कोरोना पसरतो या अफवेने वृत्तपत्रे घेणे वाचकांनी बंद केले. दुसरीकडे कठोर निर्बंधांमुळे अनेक मुद्रीत माध्यमांचे कारखाने अगदी दोन -दोन महिने बंद राहीले. कोट्यवधींचा तोटा या काळात सोसावा लागला. त्याचा पहिला फटका पत्रकारांना बसला आणि पत्रकारितेच्या ओहोटीला सुरवात झाली.
दुर्दैव असे की, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया यांनी स्वतःचे नवे स्त्रोत वापरून विश्लेषणाच्या बातम्या सर्वांपर्यंत पोचविण्याची जी गरज होती, ती भागलीच नाही, उलट सोशल मिडियावरील प्रसारीत होणाऱ्या माहितीवर या दोन्ही माध्यमांचे प्रतिनिधी अवलंबून राहीले आणि इथेच घात झाला. आज त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. आज १५ ते ३५ वयोगटातील पिढी ना प्रिंट मिडिया सर्रास वाचते, ना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आवाज ऐकते.. त्यांना हवे ते आणि हवे तेवढेच या दोन्ही माध्यमांकडून त्यांच्यापर्यंत सोशल मिडीयातून पोचते. साहजिकच कोरोनाने केलेल्या या आघाताने माध्यमे सावरलेली नाहीत. त्यामुळेच पत्रकारांच्या बेकारीचा भयानक आकडा समोर येताना दिसत आहे.
अनेकांना आठवत असेल सिंहासन चित्रपटातील पत्रकार… बुल्गानी दाढी आणि कमरेला शबनम, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा… पत्रकार असाच असावा अशी एक अपेक्षा असलेल्या समाजापुढे पत्रकार सुटाबुटात कधी आला ते कळलेच नाही. पडद्यावर पत्रकार येणार असेल, तर त्याच्या अकलेपेक्षा त्याचे सौंदर्य चांगले असले पाहिजे ही नवी मागणी जिथे पुढे आली, तिथेच पत्रकारीतेचे आभाळ संपले…जिथे मालकांनीच आज काय बातमी छापायची आणि कोणाचे गोडवे गायचे हे ठरविण्यास सुरवात केली, निवडणूका येताच पॅकेज घेण्यास सुरवात केली, तिथेच हाडाच्या व निकोप पत्रकारीतेला ग्रहण लागले..!
समाज सारे पाहत असतो. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीप्रमाणे माध्यमांची अवस्था झाली. नेत्यांकडे कामांचे कंत्राट घेणारे पत्रकार, निवडणूकीला त्याच नेत्यांकडून दहा, पंधरा लाखांचे पॅकेज घेणारे मालक कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहेत. तेच मग चित्र सामान्य जनतेपर्यंत पोचते. आणि एखादी बातमी अन्य कारणांनी जरी छापली गेली नाही, तरी पैसे घेतले, बातमी दाबली, विकाऊ पत्रकार ही विशेषणे त्यातूनच तयार झाली.. जी आज सर्वांच्याच मानगुटीवर बसली आहेत..
आता या समाजातील प्रत्येकजण पत्रकार आहे, प्रत्येकाजवळ कोणती ना कोणती बातमी आहे आणि प्रत्येकाला व्यक्त व्हायचे आहे. स्वतःवर अन्याय झाला, तर तो स्वतःच त्याचे सादरीकरण करून जनजागृती करतोय. त्यामुळे माझी कोणी दखल घ्यावी अशी अपेक्षाच आता उरली नाही आणि कोणत्याही पत्रकार परिषदेचे आमंत्रण देण्याएवढी परिस्थितीही उरली नाही. त्यामुळे दहा लाखांवरून नोकरी करणाऱ्या पत्रकारांची संख्या तीन लाखांवर घसरणे हा काही तसा धक्का नाही. मात्र निकोप समाजाच्या आरोग्यासाठी ही बाब चिंताजनक नक्कीच आहे..! ज्यांनी, ज्यांनी निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेसाठी आपले आयुष्य झोकून दिले, त्या हाडाच्या पत्रकारांना आजचे हे दिवस दिसल्यानंतर आयुष्याची संध्याकाळ आठवत असेल हे नक्की..!