सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 22 सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असून 24 सप्टेंबर हा नामनिर्देशन अर्जासाठी अंतिम दिवस असेल.
सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,इंदापूर तहसील येथे अर्ज दाखल करता येणार आहेत. कारखाना स्थापनेपासून संस्थापक स्व.शंकरराव पाटील यांच्या घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी जंग जंग पछाडले, मात्र पाटील घराण्याने त्यांची डाळ कधीच शिजू दिली नाही. राष्ट्रवादीला पाटलांसमोर नांगा टाकावा लागला. 2015 साली राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार असतानाही या कारखान्याच्या निवडणूकीकडे दुर्लक्ष केले होते, ते सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी रणांगणात उतरून थेट आव्हाण देतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सतत राजकीय भाषणांमधून राष्ट्रवादीने कर्मयोगी वर हल्ला चढवला. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी निवडणूकीत उतरून निवडणूक लढवतोय की फुसका बार ठरतोय पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे सचिव यशवंत गिरी यांनी जाहिर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज दाखल 22 सप्टेंबर पासून सुरवात होणार असून 24 सप्टेंबर हा नामनिर्देशन अर्जासाठी अंतिम दिवस असेल. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,इंदापूर तहसील येथे अर्ज दाखल करता येणार आहेत.
दाखल केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया 27 सप्टेंबरला असेल. 28 सप्टेंबर रोजी पात्र उमेदवार यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. याचसोबत 28 सप्टेंबर पासून 12 आँक्टोबर पर्यंत उमेदवारास अर्ज मागे घेता येईल. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप केले जाईल.
आवश्यक असल्यास मतदान प्रक्रिया 20 ऑक्टोबर ला सकाळी 8 ते दुपारी 5 या वेळेत पार पडेल. याबाबतचे ठिकाणनंतर जाहीर करण्यात येईल.तर मतदान मोजणी 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 08 वाजलेपासून सुरू होईल व अंतिम निकाल जाहिर केला जाईल.असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इंदापुर, कालठण, पळसदेव, भिगवण, शेळगाव या पाच गटामधून प्रत्येकी 3 संचालक व भटक्या जमाती प्रवर्ग 1, मागास प्रवर्ग 1, अनुसुचित जमाती 1, महिला राखीव 2 आणि ब वर्ग 1 असे एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत.
सन 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभारण्यात अपयश आले. त्यामुळे पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाला. कारखान्याचे संस्थापक स्व. शंकरराव पाटील यांना मानणारा सभासद वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे यावेळी शंकरराव पाटील यांच्या कन्या पद्माताई भोसले यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.