पाटस येथे सिमेंट कंपनीच्या अधिकारी, ठेकेदारांची शेतकऱ्यांना ॲट्रॉसिटीची धमकी! शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव..!

राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील सिमेंट कंपनीसाठी सुरू असलेल्या अतिउच्च दाब विद्युत वाहक तारा आणि मनोरा (टॉवरचे ) उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम शेतकऱ्यांच्या शेतजमीन आणि जागेतून राजकीय दबाव आणून जबरदस्तीने सुरू आहे.

या कामास शेतकऱ्यांनी विरोध केल्यास संबंधित कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार हे शेतकऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सरळ धमकी देत आहेत. असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून याबाबत शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

दरम्यान, यवत पोलिसांकडे याबाबत तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार यवत पोलीसांकडून घेतली गेली नाही. त्यामुळे पोलीसांच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पाटस येथील सिमेंट कंपनीसाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहत ते पाटस असे अंतरापर्यंत 220 केव्ही या अतिउच्चदाब विदयुत मनोरा उभारण्याचे आणि वाहक तारांचे काम मागील काही दिवसांपासून या परिसरातील शेतक-यांच्या शेतजमिनी आणि जागेतून सुरू आहे.

हे काम करताना संबंधित कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व राजकीय बळाचा वापर करून काम करीत आहेत अशी शेतकरी तक्रार करत आहेत. संबंधित विद्युत तारांचे आणि मनोरा उभारण्याचे काम करत असताना शासकीय अधिकारी किंवा अभियंता कोण आहे याची माहिती अजूनही शेतकऱ्यांना दिली गेली नाही.

हे काम करताना शेतकऱ्यांनी माहिती विचारल्यास संबंधित कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार हे उडवाउडवीची उत्तरे देतात, हे काम शासकीय आहे तुम्ही विरोध करू नका नाही तर तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू अशी सरळ धमकी दिली जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

राजकीय दबाव आणि अशा धमक्यामुळे अनेक शेतकरी तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.परिणामी या कामामुळे शेतक-यांच्या शेतजमिनीमध्ये मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर सिमेंट कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याबाबत लेखी तक्रार घेवून यवत व पाटस पोलीस चौकीत गेल्यास पोलीसांकडून शेतक-यांची तक्रार घेतली जात नाही.

उलट हे पोलीसांचे काम नाही तुम्ही तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन द्या असे उत्तर देवून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. असे शेतकरी सागर पोळेकर यांचे म्हणणे आहे. आमच्या खासगी शेत जमिनीतून आमची परवानगी न घेता राजकीय बळाचा वापर करून आणि दमदाटी करून जबरदस्तीने मनोरा उभारण्याचे आणि विदुयत तारांचे काम ठेकेदार आणि कंपनीचे अधिकारी करीत आहेत.

संबंधित ठेकेदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी सागर पोळेकर आणि अर्जुन खारतोडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सिमेंट कंपनी आणि शेतकरी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार राजकीय दबाव वापरून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून मनोरा उभारत असल्याने या संतापातून काही शेतक-यांनी मनोरा पाडल्याची घटना घडली आहे.

शेतकरी आणि सिमेंट कंपनीमुळे पाटस येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी यवत पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार घेऊन जात आहेत.मात्र पोलिसांकडून शेतकऱ्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे आणि कंपनी किंवा ठेकेदारांनी शेतक-यांच्या तक्रार केल्यास त्याची मात्र त्वरित दखल घेतली जात असून शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. असा आरोप शेतकरी करीत आहेत.

पोलीस शेतक-यांना दुजाभावाची वागणुक देत आहे. याप्रकामुळे पाटस परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यवत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

2 days ago