बारामती : महान्यूज लाईव्ह
स्वराज्याची शेवटची लढाई विजयाच्या रुपात लढणाऱ्या खर्डा किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्व उंचावण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सर्वात उंच ७४ मीटर भगवा ध्वज या किल्ल्यावर फडकवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी देशभरातील 74 अध्यात्मिक धार्मिक संतपीठ तसेच महापुरुषांच्या ठिकाणी या ध्वजाचे पूजन केले जाणार आहे त्याकरता या ध्वजाची यात्रा सुरू असून ही यात्रा आज बिहारमधील बोधगयेत पोहोचली.
तब्बल 18 टन वजन असलेल्या खांबावर तब्बल 90 किलोचा हा ध्वज 74 मीटर उंचीवर फडकणार आहे. शूर मराठी सैनिकांनी ज्या ठिकाणी स्वराज्यातील शेवटच्या विजयाचे स्वप्न पाहिलं आणि साकार केले, त्या खर्डा किल्ल्यामध्ये हा ध्वज उभारला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सन सोळाशे 74 मध्ये झाला होता, त्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे.
या ध्वजाचे आरोहण करण्यापूर्वी हा ध्वज महाराष्ट्रातील संतपिठे, अध्यात्मिक व महापुरुषांची वंदनीय ठिकाणे तसेच देशभरातील महत्त्वाच्या अध्यात्मिक ठिकाणी पूजन केले जाणार आहे. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणी तसेच देशभरातील अयोध्या, मथुरा, बोधगया, केदारनाथ या ठिकाणी देखील नेला जाणार आहे. त्या ठिकाणी पुजला जाणार आहे. कर्जत मधील गोदड महाराज मंदिरातील पूजनानंतर सुरू झालेली ही यात्रा आता बोधगयेत पोहोचली आहे.