सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
दुर्मिळ असणाऱ्या व सध्या इंदापूर तालुक्यात वनक्षेत्रातील काही भागात पहावयास मिळणार्या चिंकारा हरणांची होत असणाऱ्या शिकारीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक वेळा तालुक्यात रात्रीच्या वेळी शिकार यांकडून हरणांची शिकार होत असल्याची चर्चाही होत आहे. शिकारी माळरानावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शिकार करून फरार होत असल्याचे आपण ऐकत आहे. अशातच सकाळच्या प्रहरी एका आलिशान गाडीत वेगाने येऊन तीन शिकार्यांनी छ-याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून दोन चिंकारा हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना कडबनवाडी परिसरात घडली.
शिकार केलेल्या दोनही हरणांना गाडीत घालून शिकारी पसार झाले. हा प्रकार वनीकरणाच्या चेकपोस्ट नाक्याजवळ घडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही घटना शनिवारी (दि.18 ) सकाळी साडेसहा वाजता कडबनवाडी ता. इंदापूर येथे घडली.
सकाळच्या प्रहरी निर्ढावलेल्या शिकार्यांनी केलेल्या हरणांच्या शिकारीची चर्चा सर्वत्र चालू आहे. यावेळी मात्र शिकार होताना तेथील शेतकऱ्यांनी शिकार झाल्याचे पहिले.विशेष म्हणजे या भागातील शेतकऱ्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये शिकारी साठी वापरण्यात आलेले वाहन कैद झाले आहे.
शिकार प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून वन्य प्राणी प्रेमींमध्ये होत असलेल्या शिकारी बद्दल तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले की शेतातून येत असताना मोठा आवाज झाल्याने वनीकरणात आलेल्या आलिशान वाहनाकडे पाहिले असता त्यातून बंदुकीतून चिंकारा हरणावर गोळी झाडल्याचे दिसले व तिघांनी गाडीतून उतरून तडपडणा-या हरणाला गाडीत घातले.
तेथूनच शंभर फुटावर असणाऱ्या दुसऱ्या शेतातील कामगारांनाही दुसऱ्या चिंकारा ची शिकार करताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी युवकांनी सांगितले. शिकार केल्यानंतर दोन्ही हरणांना अलिशान पांढऱ्या रंगाच्या गाडीत टाकण्यात आले. त्यानंतर सदर गाडी भरधाव वेगाने निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंकारा जातीचे हरीण आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी मागील वीस वर्षांपासून आम्ही काम करीत आहोत, शिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे भजनदास पवार यांनी केली आहे.
शिकार जेथे झाली त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी शेतीच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. सदर वाहन हे त्या कॅमेऱ्यात दिसत आहे. या प्रकरणी तीन अज्ञात इसमानं वर गुन्हा दाखल केला आहे. असे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.