अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पोलीस महासंचालनालयाने महाराष्ट्रातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी, अंमलदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते.
त्या अनुषंगाने कामाच्या मुल्यांकनाचे निकष सकारात्मक नकारात्मक मापदंड इत्यादीच्या अनुषंगाने घटकातील पुर्ण वर्षात दाखल गुन्हयांची माहीती विचारात घेवून ज्या पोलीस घटकांचा भादवि कलमांन्वये गुन्हे ६००० पेक्षा जास्त आहे अशा एकुण २४ घटकांची एक श्रेणी तयार करण्यात आली होती. २४ घटकांमध्ये करण्यात आलेल्या मुल्यांकनामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.
खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडया या प्रमुख गंभीर शिर्षाखाली वर्षभरामध्ये दाखल होणाऱ्या गुन्हयांचा तपासावर प्रलंबित राहणा-या गुन्हयांची संख्या अवैध धंदयावरील प्रभावी कारवाया ( पिटा कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे) माहीती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल होणारे गुन्हे, गुन्हेगारांविरुध्द प्रभावी कारवाई (मोका, एम पी डी ए. तडीपार इत्यादी ), दिर्घ काळापासुन फरार असलेले आरोपी पकडणे, दुर्बल घटकांविरुध्द दाखल गुन्हयांची तात्काळ निर्गती करणे,
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, महिला व बालके अत्याचारांविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयांबाबत विहीत कालावधीत कार्यवाही करणे. न्यायालयाच्या समन्स, वॉरंटची बजावणी, शिक्षेच्या प्रमाणातील वाढ अपघाताची संख्या कमी करणे, मुद्देमालीची निर्गती करणे, श्वान पथक व अंगुली मुद्रा यांचा वापर करून तांत्रिक तपास करणे तसेच प्रशासकीय कामकाज जलद गतीने करणे. ( परेड, निवृत्ती वेतन विषयक कामे, विभागीय चौकशी वैद्यकीय देयके प्रशिक्षण व पदोन्नती )
या व्यतिरिक्त जातिय व सामाजिक सलोखा ठेवणे महिलांच्या सुरक्षेसाठी विविध योजना राबविणे तसेच वाहतुक सुरक्षित व सुरळित होईल यासाठी नियोजन करणे इत्यादी विविध मुद्दयांसाठी निवड समितीने मुल्यांकन करून भादवि कलमांन्वये ६००० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या एकूण २४ घटकांमधुन पोलीस आयुक्तालय, पुणे शहर या घटकाची “सर्वोत्कृष्ट पोलीस घटक” “Best Police Unit” म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पश्चिम प्रादेशिक विभाग, गुन्हे प्रशासन व सर्व पोलीस उपायुक्तांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला सर्वोत्कृष्ट पोलीस घटकाचा बहुमान प्राप्त झाला आहे.