शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य आजाराच्या आजाराने थैमान घातले असून नागरिक हैराण झाले आहेत. यात लहान मुले ही तापाने चांगलीच फणफणली असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
एका दिवसात एका गावात सरासरी रोज तब्ब्ल २० ते २५ रुग्ण आढळून येत असून, आत्तापर्यंत हजारो जणांना याची बाधा झाली आहे. या आजाराला सामोरे जाताना रुग्णांना खासगी दवाखाण्याचा रस्ता धरण्याची वेळ आली असून, दवाखान्याचा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे.
एका रुग्णास सरासरी तीन दिवसांच्या सलाईनसह उपचारासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येत आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे साथीच्या आजारावर गावागावातील सरकारी आरोग्य विभागाची यंत्रणा या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत कुचकामी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
नागरिकांच्या घर, परिसरात पाणी साचून डेंग्यू च्या डासाची उत्पत्ती होते. नागरिकांनी घरातील पाणी साठे तपासून ते कोरडे केले पाहिजेत असे डॉ. मंजुषा सातपुते यांनी सांगितले. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे.
नागरिकांनी तुंबलेली गटारी मोकळी करून द्यावी. डबडी, फुटक्या बदल्या, टायर यामधील साचलेले पाणी मोकळे करावेत. घरातील पाणी साठे नष्ट करावे आणि आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे केल्यास ही साथ आटोक्यात येईल असेही आवाहन डॉ. सातपुते यांनी केले आहे.