सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये जनावरांना लाळ खुरकूत रोगाचे लक्षणे आढळून येत आहेत, याचा गांभीर्याने विचार करून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्वाचे आहे. या अनुषंगाने लाळ खुरकूत रोगप्रतिबंधात्मक लसीची मात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे.
याची मात्रा तालुक्यामध्ये असणाऱ्या साधारणपणे पावणेदोन लाख मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण हे पशुमालकांसाठी वरदान ठरणार आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पशुपालकांनी आपापल्या जनावरांना लसीकरण करून घेऊन लाळ-खुरकत रोगाचे वेळीच निर्मूलन करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत इंदापूर तालुक्यात लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसऱ्या फेरीचा शुभारंभ आज शनिवारी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
भरणे म्हणाले की, तालुक्यातील काही ठराविक भागात जनावरांमध्ये लाळ खुरकत रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी तालुक्यात सदर लसीकरण कार्यक्रम हा पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण तालुक्यात राबवण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यात एकूण मोठी जनावरांची संख्या ही 1 लाख 70 हजार 465 एवढी असून या जनावरांसाठी एकूण 01 लाख 58 हजार लाळ खुरकत लस मात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे. याची मात्रा तालुक्यांमधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. ही लसीकरणाची दुसरी फेरी 21 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, संचालक बाळासो सपकळ, बाबासाहेब जाचक, अमित चव्हाण, निखील भोसले, तुकाराम देवकाते, डॉ. रामचंद्र शिंदे, डॉ.भीमराव जानकर, डॉ.संजय पराडे, डॉ.अभिजीत आटोळे, हनुमंत हेंद्रे, सुनील शिंदे, संजय येवले, साहेबराव शेगर, गोविंद मगर, ज्ञानेश्वर फरगडे, बाळू जाधव, ग्रामसेवक घोगरे आदींसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.