इंदापूर : महान्यूज लाईव्ह
प्रचंड रहदारी असणाऱ्या रस्त्यावर दहा रुपयांच्या तीन नोटा फेकून तुमचे पैसे रस्त्यावर पडल्याचे सांगत तीन अज्ञात चोरांनी पैशाची पिशवी घेऊन जाणा-या एका दुचाकीस्वाराला सांगितले. त्या दुचाकीस्वारानेही ते पडलेले पैसे घेण्यासाठी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करत पैसे घेण्यासाठी जात असताना अज्ञात चोरांनी गाडीच्या हॅन्डलला लावलेल्या 2 लाख 33 हजार रूपये रोख रकमेची पिशवी नजरेसमोरून घेऊन धूम ठोकली.
हा प्रकार पाहून पैशाच्या मालकाची पाचावर धारण बसली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना गुरूवार दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 वाजताचे दरम्यान घडली. याबाबत विकास मानसिंग भोसले (वय 42 वर्षे रा.डाळज नं.1, ता.इंदापूर,जि.पूणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरूवार दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विकास भोसले हे इंदापूर शहरातील विकास हीरो मोटार सायकल शोरूम जवळुन दुचाकीवरून निघाले होते.दरम्यान एका अनोळखी इसमांनी रस्त्यावर 10 रूपयाच्या तीन नोटा टाकल्या आणि तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहेत असे भोसले यांना सांगीतले.
त्यावर भोसले यांनी लागलीच दुचाकी मोटार सायकल रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते रस्त्यात पडलेले पैसे गोळा करण्यासाठी गेले. याच दरम्यान एका अनोळखी मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी भोसले यांच्या दुचाकीच्या हॅन्डल ला अडकवलेली पैशाची पिशवी घेवुन दुचाकीवरून पळून गेले.
भोसले यांनी आपल्या दुचाकीला अडकवलेल्या पिशवीमध्ये 2 लाख 33 हजार रूपये रोख रक्कम होती. ही रक्कम दोन अज्ञात अनोळखी इसमांनी चोरून नेली असून याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करत आहेत.