बारामती : महान्यूज लाईव्ह
संत श्री. बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात 10 सप्टेबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलिस कोठडीत बारामती न्यायालयाने आज आणखी तीन दिवसांची वाढ केली.
पण बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आणि फसवणुकीच्या व जादूटोण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या या मनोहर भोसलेसाठी पुण्यासारख्या शहरातुन उच्चशिक्षितांची गर्दी बारामतीत आज न्यायालयात झाली होती.
अर्थात आपल्या बुवाबाजीच्या पाठीशी आहोत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या भक्तांनी केला, परंतु या भक्तांची गर्दी पाहून आजवर प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठा व सन्मान भोगलेल्या मनोहरमामाला काही वेळाने खरोखरच पित्त वाढल्याने त्रास झाला. त्याला डॉक्टरांकडून जुजबी उपचार घ्यावे लागले.
11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. गुरुवारी रोजी ती संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधिश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर करण्यात आले. मागील वेळीप्रमाणे गुरुवारीही मनोहर भोसले याच्या भक्तांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले.
सरकार पक्षाकडून ॲड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यतील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे असे सांगितले. तर या सर्व कारणांमुळे पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती.
न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली. शुक्रवारी 10 तारखेला सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले.
बारामतीतील शशिकांत खऱात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.
विशाल वाघमारे, ओंकार शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.