बारामती : महान्यूज लाईव्ह
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, माजी आमदार गोपीचंद पडळकर यांचा गुरूवारचा नियोजित बारामती दौरा रद्द झाल्याचे समजते. गुरूवारी ते बारामतीतील जळोची येथील मालमत्तेची पाहणी करणार होते. त्यांच्या नियोजित दौऱ्याने बारामतीसह राजकीय वर्तुळात लागलीच चर्चेला सुरवात झाली होती. मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांचे स्वीय सहायक असलेल्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कथित संपत्तीची पाहणी सध्या सोमय्या करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतील जळोची येथील खरमाटे यांच्याशी संबंधित एका कथित मालमत्तेची पाहणी ते करणार होते.
त्यासाठी त्यांनी तसे जाहीर करून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना या कागदपत्रांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन ती सोमय्या यांच्या कार्यालयाकडे पाठवली आहेत. सोमय्या ज्या मिळकतीची पाहणी करणार आहेत, त्याविषयी अद्यापही गुप्तता पाळली जात असून सोमय्या यांनी खरमाटे यांच्या सांगलीतील कथित फार्म हाऊसचीही पाहणी याअगोदर केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान सोमय्या बारामतीत येणार असल्याने भाजपशी संबंधित व इतरही काही संघटनांचे पदाधिकारी त्यांना भेटणार होते. मात्र त्यांच्या कार्यालयाकडून बारामतीचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. आज त्यांच्या मुंबईतील कार्यालयात संपर्क साधला असता तेथील सूत्रांनी बारामतीची सोमय्या यांची उद्याची नियोजित भेट रद्द झाल्याचे सांगितले.