संदीप मापारी पाटील, बुलढाणा
राज्यातील विदर्भ व मराठवाड्यावर वरूणराजाने अवकृपा केली असून अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शेती व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर नद्यांना आलेल्या महापुराने गाव, शहरांमध्ये नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गौताळा घाटात पुन्हा दरड कोसळली. जोरदार पावसामुळे एका आठवड्यात दोनदा दरडी कोसळली असून दरड कोसल्याने वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोठ्या मोठ्या दगडांचा रस्त्यात खच पडल्याने वाहतूक मार्ग बंद झाला आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
नांदेड जिल्ह्यातही ढगफुटी झाली असून शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील मांजरम परिसरात ढगफुटी झाली आहे. या परिसरात सतत १२ तास पाऊस झाला. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याखाली गेलेली जमीन खचली असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोळ्यासारख्या सणाच्या वेळेस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडूरंग शिंदे यांनी सर्व नियम अटी बाजूला सारून तात्काळ १०० टक्के पिक विमा व अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकर्याला द्यावी अशी मागणी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दोन जण वाहून गेले असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक रवाना करण्यात आले असून नांदूरा तालुक्यातील पातोंडा येथील ओम गव्हाडे हा 14 वर्षीय युवक पूर्णा नदीत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.
शेगांव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील 18 वर्षीय आदित्य संतोष गवई नाल्याच्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी दिली आहे. दरम्यान बुलडाणा तालुक्यात अनेक नदी-नाल्यांना पूर आलेला आहे.
आज सकाळ पासून बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदी आपले पात्र सोडून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने पूर्णपने शेकडो एकर शेती खरडून गेली आहे. या पुराचा फटका बुलडाणा तालुक्यातील पाडळी, पळसखेड नागो, दत्तपुर, देऊळघाट, कोळवड व सागवान येथील शेतीला बसला आहे.
बुलडाण्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी आपल्या पथकासह पैनगंगा नदी काठच्या पूरग्रस्त शेतभागाची पाहणी केली. यावेळी पळसखेड नागो येथील काही शेतकऱ्यांनी त्यांना लवकर मदत देण्याची मागणी केली असता तहसीलदार रुपेश खंडारे म्हणाले की तात्काळ पीक नुकसानीचे सर्व्हे केले जातील व शासनाला लागलीच अहवाल पाठविला जाणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. बुलडाण्यातील पैनगंगा नदीला पुर आला असून खामगाव येथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस 4 इंचापेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचा अंदाज केला जात आहे. खामगावात घऱांमध्ये पाणी शिरल्याचे सांगितले जाते असून खामगाव येथील बोर्डी नदीलाही पूर आला आहे.
बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती तर खामगाव शहर जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे,नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
अमरावती शहरात मुसळधार पावसाने मार्केटमध्ये शिरले पाणी, लाखो रुपयाच्या मोबाईलची नासाडी
अमरावती जिल्ह्यासह शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अमरावती शहरातील राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले आहे. या मार्केटमध्ये 25 पेक्षा अधिक मोबाईलची दुकाने आहेत. या मोबाईलच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण मोबाईल हे खराब झाल्याची माहिती येथी व्यापाऱ्यांनी दिली.