सांगली महान्यूज लाईव्ह
संकटं येताना कधी एकटीदुकटी येत नाहीत.. सांगलीच्या रत्नाबाई जंगम यांच्या बाबतीतही तसेच झाले.. २५ वर्षापूर्वी कर्तासवरता मोठा मुलगा गेला.. धाकटा मुलगा अपंग असल्याने आणि पतींच्या शारीरीक मर्यादा असल्याने जंगम कुटुंबासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर असा प्रकार झाला. मग रत्नाबाईंनी पदर खोचला.. पुरुषी मक्तेदारी असलेल्या पंक्चरचे दुकान त्यांनी चालवण्याचा निर्णय घेतला.. मुली पदवीधर केल्या, त्या सासरी गेल्या.. आज तब्बल २५ वर्षे उलटलीत.. रत्नाबाई आता वयाच्या पंचाहत्तरीत पोचल्या आहेत. मात्र हातात पान्हा घेऊन काम करण्याचा उत्साह तोच आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह यूट्यूब, फेसबुक पेज वर पाहू शकता..
उत्साह तोच अशासाठी, की दिड वितीचे पोट त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणि फक्त स्वतःचे पोट नाही, तर कुटुंबातील तिघांचा संसार त्यांना पेलवावा लागतो. त्यामुळे रत्नाबाईंच्या अंगावर घराचा कारभार पेलण्याची जबाबदारी आली. आपला अपंग मुलगा आणि पती यांच्यासाठी त्या या वयात पंक्चरचे दुकान चालवत आहेत.
वय सत्तरीकडे झुकले, आयुष्याची संध्याकाळ सुरू आहे, मात्र त्या स्वाभिमानाचे पंख लावून पुरूषांच्या बरोबरीने हा व्यवसाय करत आहेत. रत्नाबाईंचे सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चर नावाने दुकान आहे. रत्नाबाईंचा या दुकानात सकाळी दहा वाजता दिवस सुरू होतो आणि रात्री आठ वाजता संपतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रहाटगाडगे सुरू असते.
पंक्चर काढण्याच्या या व्यवसायात बहुतेक सर्वच ठिकाणी फक्त पुरूषच आहेत. मात्र रत्नाबाई या दुकान चालवतात. आता त्यांच्याकडे पाहून कोणालाच आश्चर्य वाटत नाही. रत्नाबाई यांचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला.. आणि त्याने सुरू केलेला पंक्चर व्यवसाय पती रामचंद्र सांभाळू लागले.. मात्र त्यांना शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने ग्राहक परत जाऊ लागले.. त्यात घराचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न कमी होते.. त्यात घरात एका अपंग मुलाचे संगोपण करायचे आणि तीन मुली शिकवायच्या होत्या.
याचा विचार करून रत्नाबाईंनी पंक्चर कशी काढायची हे तंत्र शिकून घेतले आणि पतीबरोबर हा व्यवसाय सुरू ठेवला. या व्यवसायातून त्यांनी परिसरातील दुचाकी, तीन चाकी, रिक्षाचालक जोडले आहेत..ते ग्राहक म्हणून दुरूस्तीसाठी आपले वाहन पहिल्यांदा रत्नाबाईंकडेच आणतात. रत्नाआज्जीना एकूण पाच मुलं, यामध्ये तीन मुली आणि दोन मुले आहेत. एक मुलगा देवाघरी गेला आणि एक अपंग, तर तीन मुली पदवीधर होऊन त्यांची लग्ने झाली.