बारामती : महान्यूज लाईव्ह
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री, आमदारांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आघाडी उघडली असून दोन दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बारामती, सांगलीत बेकायदेशीर संपत्ती असल्याचा दावा केला होता. त्याची पाहणी करण्यासाठी ते गुरूवारी (ता.९ ) बारामतीत येत आहेत. त्यांच्यासमवेत भाजपची मुलूखमैदान तोफ आमदार गोपीचंद पडळकर हेही येणार आहेत.
यासंदर्भात भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. गुरूवारी किरीट सोमय्या बारामतीत येऊन खरमाटे यांनी बारामतीत घेतलेल्या संपत्तीची पाहणी करणार आहेत. तीन दिवसांपूर्वी सोमय्या यांनी नाशिकमध्ये जाऊन मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीची पाहणी केली होती. आता ते बारामतीत जळोची येथे खरमाटे यांच्या मुलाने सुरू केलेल्या कथित अपार्टमेंटच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत. यासाठी बारामतीतील भाजपचे पदाधिकारी सध्या या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची कागदपत्रे जुळविण्याच्या कामात मग्न आहेत. अनिल परब यांचे स्वीय सहायक म्हणून बजरंग खरमाटे या्ंची कारकिर्द गाजली. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या अनिल परब अ़डचणीत आले आहेत.
खरमाटे यांच्या सांगलीतील संपत्तीची पाहणी सेमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच केलेली आहे. आता बारामतीत सोमय्या पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या आगमनाकडे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच विरोधकांचेही लक्ष असणार हे नक्की..!