अॅड. विजय सोनवणे, महान्यूज लाईव्ह
नगर – कर्जत तालुक्याचे नाव सध्या राज्यात सावकारीवर कारवाई करणारा तालुका म्हणून गाजत आहे. त्यातच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या जोडीला केवळ सावकारांवरच नाही, तर गावात विनाकारण दहशत माजविणारे सडक सख्याहारी व नामचीन गुंडांचाही बंदोबस्त पोलिसांनी सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील पाटेगाव येथील दोघांना पोलिसांनी अशीच कोठडीची हवा दाखवली..! विचार करा, तब्बल ४ दिवस पोलिस कोठडी मिळाल्यावर त्यांची काय स्थिती झाली असेल?
कर्जत तालुक्यातील पाटेगाव या गावात अक्षय प्रभाकर डाडर व समाधान सर्जेराव डाडर (दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत) हे दोघे गावात दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षय याचे गावातील चिकनचे दुकान आहे. गावातील चंद्रकांत प्रकाश साबळे यांनी पाटेगावात चिकनचे दुकान नव्याने सुरू केले. नवीन दुकान का टाकले असे म्हणुन चंद्रकांत प्रकाश साबळे व त्यांचे चुलते संदिप साबळे यांना अक्षय याने त्रास देणे सुरू करून कोयत्याने मारहाण केली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे फौजदार अमरजित मोरे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, महादेव कोहक, संतोष फुंदे, शकील बेग यांचे पथक गावात पाठवले व दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने अक्षय व समाधान डाडर या दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यातील अक्षय याच्यावर यापूर्वीही एक गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार अमरजित मोरे व त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार अमरजित मोरे, कोहक हे करित आहेत.