बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2020-21च्या गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या 3100 रुपये दरानंतर आज माळेगावने देखील ऊसदर संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केला. यामध्ये प्रतिटनी 2750 रुपये दर दिला जाणार असून, गेटकेन धारकांना 2600 रुपये प्रति टन ऊस दर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने किती ऊस दर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज माळेगाव च्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा दर जाहीर करण्यात आला. आतापर्यंत माळेगाव कारखान्याने एफआरपी पोटी 2459 रुपये सभासदांना दिले असून, खोडकी साठी 100 रुपये अनुदान दिले आहे. आता उर्वरित 191 रुपये प्रतिटन सभासदांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
आज माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळाची बैठक कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय झाला.