दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
राजकीय हेतू बाजूला ठेवून, वाई शहर घटक मानून विकास साधण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या प्रत्येक विकास कामात राज्य शासनाच्या मदतीने मोठी भर घालता आली, सरकार आपले नसतानाही विकास कामांवर प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही, याचे समाधान आहे, असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
येथील सिद्धनाथवाडीत नगरोत्थान योजनेतून ३९ लाख रुपये खर्चाच्या बिरोबा- विठोबा मंदिर सभागृह लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्ष अनिल सावंत, पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, प्रतापराव पवार, संजय लोळे, नगरसेवक भारत खामकर, राजेश गुरव,चरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरसेवक, पालिका व प्रशासन यांनी सामाजिक सभागृहाचे उत्कृष्ट काम साकारल्याबद्दल आमदार मकरंद पाटील यांनी कौतुक केले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुधीर खरात यांनी भाविकांसाठी निवास, शौचालय या सुविधांनी युक्त परिसर होण्यासाठी श्री. पाटील यांच्या अथक प्रयत्नांनंतर मोठे काम मार्गी लागले. राज्याबाहेरील भाविकही येथे श्रद्धेने येतात. यामध्ये नगरसेवकांनी केलेला पाठपुरावाही महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले.
नगरसेविका सौ.रेश्मा प्रदीप जायगुडे यांनी प्रास्ताविकात प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतला. कार्यक्रमात बांधकाम ठेकेदार विष्णू बरकडे, जागा देणगीदार बापू सावंत, तांत्रिक सल्लागार मोहन काटकर, नोकरी मार्गदर्शनाबद्दल राजेंद्र खरात यांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेवक कांताराम जाधव, प्रदीप जायगुडे, लक्ष्मण खरात, बापूराव खरात, नारायण बरकडे, राजू कारळे, विनोद चव्हाण, स्वागता खरात, शंकर वाघ, संजय चव्हाण, अशोक सूर्यवंशी, युगल घाडगे यांनी स्वागत केले. संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन, अशोक खरात यांनी आभार मानले.