दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
मांढरदेव परिसरातील अंबरदरा, लिमणी, पालान, पाचीआंबा, खोपचा कडा या डोंगर रांगांसह
बोपर्डी, वेळे, डोंगर रांगांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने मांढरदेव येथील रहिवासी असलेले दशरथ मांढरे यांची शेळी फस्त केली आहे. तरी वरील परिसरातील नागरीकांनी सावध रहावे असे आवाहन वाईच्या नुतन महिला वन अधिकारी स्नेहल मगर यांनी केले आहे.
वेळे (ता. वाई) येथील परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आज समोर आले. वेळे गावातील काही तरुण रोज सायंकाळी व्यायाम व धावण्यासाठी सोळशी घाटात जातात. आज नेहमीप्रमाणे ते जात होते, तेव्हा घाटाच्या पहिल्याच वळणावर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले.
याआधी काही दिवसांपूर्वी चवणेश्र्वरच्या डोंगरात बिबट्या असल्याचे दिसून आले आहे. कदाचित हाच बिबट्या वेळे परिसरात दाखल झाला असल्याची शक्यता नागरीक वर्तवत आहेत. ही बातमी वेळे व सोळशी परिसरातील लोकांना समजल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून त्यांना घराबाहेर पडताना बिबट्याचे भय वाटू लागले आहे.
वन विभागाने याबाबत दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, असे आवाहन वेळे परिसरातील नागरिकांनी केले आहे. दरम्यान वाई वन परिक्षेत्रातील मांढरदेव, बोपर्डी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असल्याचे वनविभागाने परिसरातील लोकांच्या माहितीवरून सांगितले.
ग्रामस्थांना स्वसंरक्षणासाठी व्हिडिओ पाठवून त्यातील माहितीनुसार काळजी घेण्याचे आवाहन व सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना शेअर करावा असे आवाहन वाई वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
वन्य प्राण्यांना दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे डोंगररांगावर दुर्भिक्ष जाणवत असल्याने हे वन्यप्राणी डोंगर उतरून मनुष्यवस्तीमध्ये वावर करीत आहेत. दरम्यान वनविभागाच्या मार्फत याबाबत अन्य माहिती उपलब्ध होत नसली तरी या तिन्ही गावाच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.