कल्याण : महान्यूज लाईव्ह
कल्याण मध्ये एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली. पोलीसांची वेशभूषा करून चोरी करण्याचे प्रकार आपण नेहमी पाहतो, मात्र अशाच प्रकारे वेशभूषा करत कल्याण तालुक्यामधील म्हारळ गावामध्ये तीन चोरांनी एटीएम फोडत लाखोचा डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान आय सी आय सी आय या बँकेचे ए टी एम तीन अज्ञात चोरटयांनी कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले. विशेष म्हणजे यामधील एका चोराने सुरक्षा रक्षक असल्याची वेशभूषा करून एटीएम च्या बाहेर पहारा दिला.
तर दुसऱ्या चोरट्यांनी पांढ-या रंगाचा रेनकोट घालून हत्याराने ए टी एम मशीन तोडून एक लाख काढले. नंतर दोन्ही चोर एका दुचाकीवर निघून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे एटीएम मशीन फोडताना एटीएम मशीन मधील सेन्सरमुळे एटीएम सुरक्षा कंट्रोल रूमला चोरीची माहिती मिळाली.
त्यांनीही लगेचच संबंधित ठिकाणी चोरी सुरु असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूम ला दिली. मात्र घटना स्थळी पोलीस उशिरा पोहोचले दरम्यान चोर चोरी करुन पसार झाले.या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने म्हारळ गावासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे दयावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
दरम्यान, टिटवाळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी एटीएम चोरीची घटना घडली.चोरांनी एकप्रकारे पोलिसाला ही अनोखी भेट देऊन पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. आता पोलीस या चोराला कश्या प्रकारे शोधून काढतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.