राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील एका सिमेंट कंपनीसाठी उच्च दाबाच्या विद्युत लाईनसाठी टॅावर उभारण्याचे काम कंपनी पेट्रोल पंप चालक आणि शेतक-यांना कोणतेही पुर्वसुचना न देता सुरू केले आहे.
या उच्च दाबाच्या विद्युत लाईनमुळे पेट्रोल पंपास मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना होवून जीवीतहानी झाल्यास त्यास जबाबदर कोण ? शासनाने हे काम त्वरीत थांबावे अशी मागणी मोरया पेट्रोल पंपाच्या चालकाने दौंड तहसीलदार आणि यवत पोलीसांना निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड तालुक्यातील राजकीय नेते मंडळीच्या फायद्यासाठी पाटस – कानगाव परिसरात सिमेंट कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. या सिमेंट कंपन्यांना परिसरातील शेतक-यांनी सुरवातीपासूनच विरोध केला आहे. पाटस आणि कानगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या कंपन्यांना शेतकरी आणि नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक गावपुढाऱ्यांना हाताशी धुरून बेकायदा ना हरकत घेतले. त्यामुळे पाटसच्या ग्रामसभेत ग्रामस्थ आणि शेतक-यांनी धारेवर धरले होते. आता या परिसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
एका सिमेंट कंपनीसाठी सध्या विद्युत लाईन आणि मनोरा उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना कंपनीने आणि संबंधित ठेकेदाराने नियोजित जागेतून न नेता नियोजित जागेतील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने ही विद्युत लाईन आणि मनोरा उभारण्याचे काम संबंधित ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणाहून सुरू केल्याचा आरोप या भागातील शेतकरी करीत आहेत.
या विद्युत लाईनचे काम हे पाटस कानगाव रोडलगत असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या श्री. मोरया पेट्रोल पंपाच्या बाजूने अगदी जवळून जात आहे. ही विद्युत लाईन नेताना पेट्रोल पंप चालकास कोणतेही कल्पना किंवा पुर्वसुचना दिली नाही. हा ठेकेदार या भागात स्थानिक असल्याने कंपनीने राजकीय नेत्यांच्या शिफारशीमुळे हे काम दिले आहे. यामुळे हा ठेकेदार विरोध केलेल्या शेतक-यांना धमकीची भाषा वापरत आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
ही विद्युत लाईन उच्च दाबाची असुन ती ज्वलनशील आणि स्फोटक असलेल्या पेट्रोल पंपालगत जाणार आहे. या पेट्रोल पंपात रोज 15 हजार ते 20 हजार लिटर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असतो. तसेच या पेट्रोल पंपाच्या आसपास पाचशे ते सातशे लोकसंख्या असलेली मोठी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीतील नागरिकांच्या जीवीतीस धोका होऊ शकतो.
या विद्युत लाईनमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत लाईनच्या मुळे याठिकाणी मोठा अपघात झाल्यास पेट्रोल पंपामधील डिझेल आणि पेट्रोलचा स्फोट होवून अपघात होवून जिवीतहानी झाल्यास त्यास पेट्रोल पंप चालक
जबाबदार नसून त्यास संबंधित सिमेंट कंपनी, संबंधित ठेकेदार आणि जर कामास परवानगी दिली असेल तर महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरावे असे पेट्रोल पंप चालकांनी तहसीदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कारण संबंधित कंपनी आणि ठेकेदाराने हे काम करताना सुरक्षेतेची कोणतेही उपाययोजना केली नाही. उलट हे काम करताना शेतक-यांची शेतपिके, फळबागा तसेच विविध मोठी झाडे पाडली जात आहेत. राजकीय दबाबतंत्र वापरून हे काम रेटून नेले जात आहे. प्रशासनाने हे काम त्वरीत थांबाबवे अशी मागणी पेट्रोल पंपाचे मालक सोनवणे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.