राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : कुरकुंभ येथे खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा आणि वाळू धुण्याच्या अड्ड्यावर दौंड पोलिसांनी अखेर छापा टाकून कारवाई केली. एक वाळुने भरलेला ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशीन पोलिसांनी जप्त केला आहे, याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींवर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कुरकुंभ येथील बेकायदा वाळू अड्ड्यावर पोलीसांनी कारवाई केली हे कौतुकास्पद आहे, मात्र हा व्यवसाय करणाऱ्या वाळू माफियांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. हे वाळू माफिया मोकाट फिरत आहेत. फक्त ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीन चालक यांच्यापुरती ही कारवाई मर्यादित नसावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणी ट्रॅक्टर चालक दशरथ दादा गायकवाड ( वय 21, मुळ रा.नांदगाव. ता.कर्जत.जि.नगर, सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे), जेसीबी मशीन चालक विकास नारायण चाळक (वय 30 रा.लहुरी ता. केज, जि. बीड सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड,जि.पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहनचालकांची नावे आहेत.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंभ आणि औद्योगिक वसाहत परिसरातील मटका, गावठी दारू, बेकायदा वाळू उपसा आदी अवैध व्यवसाय जोमाने आहेत. याबाबत चे वृत्त महान्यूज लाईव्ह मध्ये शनिवारी प्रसिद्ध होताच या वृत्ताची त्वरित दखल पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घेतली. कुरकुंभ येथे सुरू असलेल्या बेकायदा व्यवसाय कारवाई साठी पोलीसांचे पथक तैनात केले.
या पथकाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा अड्ड्यावर शनिवारी ( दि.4) सकाळी छापा टाकला. यावेळी पोलीसांना पुणे सोलापूर सेवा रस्त्याच्या लगत पांढरेवाडी रोडला शिवशंकर लाॅन्सच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये एका ट्रॅक्टर मध्ये बेकायदा वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये चोरुन वाळू भरुन वाहतुक करून तसेच ट्रॅक्टर मधील वाळू जेसीबी (क्रमांक एम एच 42,एक, एक्स 8323) मशीन ने ही वाळू पाण्याने धुवून त्यातील घाण काढत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी याप्रकरणी ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीन जप्त करीत दोन्ही वाहनांच्या चालकांवर गौण खनिज उत्खनन आणि पर्यावरण अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केवळ वाहन चालकांवर गुन्हा दाखल केले आहेत. या प्रकरणातील मूळ वाळू माफियांवर मात्र अजून कारवाई झालेली नाही.
दोन्ही ही वाहनांचे वाहन चालक बाहेरील जिल्ह्यातील आहेत, हा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक वाळू माफिया मात्र मोकाट फिरत असुन त्यांच्या वर गुन्हे दाखल करावेत, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घालून हा व्यवसाय करणाऱ्या मुळ वाळू माफियांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.