मी सदैव तुमच्या ऋणात राहीन : शीला सोनवले
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
सिंडिकेट बँक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षा शीला सोनावले ह्या नुकत्याच सेवानिवृत्तझाल्या, त्या गेली 37 वर्षे सिंडिकेट बँकेत कार्यरत होत्या. नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. महेंद्र प्रभुलकर आणि संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यावेळी त्या बोलत होत्या. सत्काराला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि इतर सहकाऱ्यांना दिले आणि सर्वांचे आभार मानले.
त्या एक अतिशय लोकप्रिय नेता आहेत, संघटनेत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. संघटनेत एक सभासद ते संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी देशपातळीवर महिला संघटक सेल मध्ये ही उपाध्यक्ष पद भूषवले आहे . एक वचन बद्ध स्त्री तसेच सिंडिकेट बँकेची आयर्न लेडी म्हणून त्या ओळखल्या जातात.
आपल्या कार्यकाळात त्या नेहमी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व त्यांच्या गरजा समजून घेऊन सतत त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढत राहिल्या आणि व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत राहिल्या.
हे सर्व बँकेच्या सहकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे या समारंभात त्यांच्या शाळेत असतानाच्या दहावीच्या मित्रमैत्रिणींनी देखील उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
वक्त्यांनी आपल्या भाषणात बोलताना शीला सोनवले यांना सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच एक कुशल व्यक्तिमत्व तसेच आयर्न लेडी असे संबोधित केले. हा कार्यक्रम गोवर्धन हॉल पुणे शनिवार पेठ येथे पार पडला. निरोप समारंभास सिंडीकेट बँकेचे तसेच कॅनरा बँकेचे युनियन पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
सुनीता बर्डे आणि केतकी सोनावले ह्यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र प्रभुलकर, मनोज पंडीत, मकरंद करंदीकर आदींनी मार्गदर्शन केले.