बीड : महान्यूज लाईव्ह
बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आमदार पुतणे संदीप क्षीरसागर हे शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचं काम करत असल्याचं म्हणत काका भारतभूषण क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले.
एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या एक हाती सत्ता आहे. बीड आणि परळी या दोन विधानसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला. बीड मध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागरांचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
यानंतर या दोघांमधील संघर्ष सुरूच आहे. आता काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांना कोंडीत पकडले आहे, त्यामुळे भारतभूषण क्षीरसागर चांगलेच संतापले आहेत.
बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार क्षीरसागर शहराच्या विकास कामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेला वेगळा न्याय आणि बीड नगरपरिषदेला वेगळा न्याय का? असा सवाल भारतभूषण क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
दरम्यान या पत्रकार परिषदेत नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी आपले चुलत बंधू संदीप क्षीरसागर यांनी शहरासह ग्रामीण भागाचा कशी वाट लावली, याचा व्हिडिओ दाखवून त्यांच्या कामाची पोलखोल केली. येणाऱ्या काळात प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास नगरपरिषदेच्या नगरसेवकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
दरम्यान याविषयी संदीप क्षीरसागर यांनी बोलणे टाळले. प्रत्येक वेळी राजकीय कुरघोडी करणाऱ्या काकांवर यावेळी पुतण्याने कुरघोडी केली आहे. नगरपरिषदेचा निधी त्यांनी पळवल्याचा आरोप केल्याने बीडचं राजकारण चांगलेच तापले, मात्र याचा नाहक फटका बीडच्या जनतेला सहन करावा लागत आहे.