जनतेच्या जिवाशी चालवलेला पोरखेळ थांबवा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोविडची तिसरी लाट येणार असून त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे ओरडून सांगणा-या राज्य शासनाने गंभीर परिस्थितीत चक्क कोविडचे रुग्ण कमी झाल्याचे कारण देत पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.1 सप्टेंबर पासून बंद करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
सध्या पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असताना इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटर बंद करून पाचशेहून अधिक कोरणा रुग्ण बारामतीकडे शिफ्ट करण्यास निघालेल्या शासनाने इंदापूरकरांची क्रूर चेष्टा चालवली आहे, असा घणाघाती आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
शासनाने जनतेच्या आरोग्याशी चालवलेला पोरखेळ थांबवावा असे आवाहन करत इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील एकही कोरोना रुग्ण बारामतीच्या सेंटरला जावू देणार नाही, अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली असून कोरोना रुग्णांवर इंदापूरातच उपचार व्हावेत, अशी जोरदार मागणी पाटील यांनी केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यशासन हे कोविडची तिसरी लाट येणार असून त्यास तोंड देणेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देत आहे. अशी काळजीची परिस्थिती असताना शासनाकडूनच चक्क कोविडचे रुग्ण कमी झाल्याचे कारण देत पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.1 सप्टेंबर पासून बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शासनाने कोविड रुग्णांचा जीव वाचण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करू नयेत, अशी मागणी पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, इंदापूर येथीलही कोविड केअर सेंटर बंद करण्यात येऊन इंदापूर तालुक्यातील रुग्णांना आता उपचारासाठी थेट बारामती येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.इतक्या लांब ठिकाणी रुग्णांची व जनतेची गैरसोय होणार आहे हे सध्याच्या खुळ्या सरकारला कधी कळणार हे समजत नाही? इंदापूर तालुक्यात कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.
दिवसाला सुमारे 40 ते 50 च्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत, तर काहींना दुर्दैवाने जीवही गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील ठीकठिकाणची त्याचबरोबर इंदापूरचे कोरोना सेंटर चालू राहणे गरजेचे आहे.
असे सांगून पाटील पुढे म्हणाले, कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात गंभीर दिसत आहेत. कोरोना रुग्णांवरती तालुक्यामध्ये जवळच तात्काळ चांगले उपचार मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, covid-19 अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या आरोग्य व्यवस्था मजबूत करणे महत्त्वाचे असताना, शासनच आहे ती पदे रद्द करून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे.शासनाने हा पोरखेळ थांबवावा. केंद्र सरकारला काही झाले की जबाबदार धरू नये. राज्य शासनाने स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या निर्णया संदर्भात आम्ही शासनस्तरावर वरिष्ठांची भेट घेणार असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना केअर सेंटर बंद करू देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.