शिरूर : महान्युज लाईव्ह
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत “आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका” पुरस्कार मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील राणी राजेंद्र कांबळे यांना बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
राणी कांबळे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून बीटस्तरावर वजन क्षमता, पूर्व शालेय शिक्षण, आहार वाटप, कुपोषण निर्मूलन, सी ए एस कामकाज, पोषण अभियान, आदर्श अंगणवाडी संकल्पना, विविध प्रशिक्षण प्रभावीपणे राबविणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. या उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना राणी कांबळे यांनी सांगितले की, हा पुरस्कार मिळाला, त्यामध्ये माझे पती राजेंद्र कांबळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आग्रहामुळे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. उच्च शिक्षण घेतल्याने पर्यवेक्षिका होता आले व त्याच प्रमाणे उत्कृष्ट काम करता आले. या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार मिळाला. सध्या पुरस्कार अनेकांना मिळतात. परंतु मला मिळालेला हा पुरस्कार अतिशय मेहनतीने केलेल्या कामाचा आहे. पुढेही यापेक्षाही मोठा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करीत राहील असे यावेळी त्यांनी सांगितले.
या प्रसंगी शामराव चकोर (भारत सरकार कृषी व अनुसंधान संशोधन संस्था दिल्ली सदस्य),आदर्श पोलीस पाटील गंगाधर फराटे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे, मा.मुख्याध्यापक अशोक वेदपाठक, संभाजी शेलार, मोहन शेलार,राजेंद्र कांबळे,किरण गायकवाड, सागर वेदपाठक, मनोज ढमढेरे,दत्तात्रय सोनवणे, ईश्वर गायकवाड उपस्थित होते.