महामार्गालगतच खुलेआम वाळू उपसा आणि वाळू धुण्याचा व्यवसाय तेजीत..!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कुरकुंभ आणि औद्योगिक वसाहत परिसरातील मटका, दारू अडयावर धाड टाकून मोठी कारवाई केली होती, मात्र पवार यांच्या बदलीनंतर कुरकुंभ परिसरात पुन्हा मटका, गावठी दारू, जुगार अवैध व्यवसाय जोमाने सुरू झाले आहेत.
एवढेच नाही आता तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पत्र्याचे संरक्षण भिंत करून त्यांच्या आतमध्ये रात्रीच्या सुमारास ओढ्यातून बेकायदा वाळू उपसा केलेली वाळू धुवून आणि ट्रॅक्टरच्या साह्याने चाळून त्याचा साठा व त्याची चोरुन विक्री आणि वाहतूक खुलेआम केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून हा प्रकार खुलेआम सुरू आहे, याला कारण ही तसेच आहे. हे माफिया स्थानिक महसूल अधिकारी आणि कर्मचारी , पोलीस कर्मचारी यांच्याशी आर्थिक तडजोड केली असल्याने आमच्यावर कोणी कारवाई करणार नाही असे स्थानिक नागरिकांना सांगत आहेत.
सर्वसामान्य नागरिकही त्यामुळे तक्रार करण्यास पुढे येत नाही, या व्यवसायिकांना राजकीय वरदहस्त आहे. तसेच कुरकुंभ बारामती रोडलगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणि पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजार मैदानात मटका आकडाचा खेळ जोरात सुरू आहे. मटका, आकडा घेण्यासाठी टोळके बाजार मैदानात ठिकठिकाणी बसलेले असतात येथे गर्दी होते.
एकूणच कुरकुंभ परिसरात पुन्हा अवैध धंदे व्यवसाने डोके वर काढले असून हे व्यवसाय सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील यांनी लक्ष घालून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा आणि वाळू धुण्याच्या अड्ड्यावर कारवाई करुन संबंधित व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करावा तसेच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मटका, दारू, जुगार अड्ड्यावर कारवाई करुन संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून कायद्याचा आणि खाकीचा धाक दाखवावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.