प्रफुल जांभुळकर यांचे कारवाई करण्यासाठी पोलीसांना निवेदन…
वानवडी गावठाणातील अवैध धंदे तसेच पालिकेच्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या मागे विठ्ठलराव शिवरकर उद्यान व बापूसाहेब केदारी जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्यपींनी उच्छाद मांडला आहे.
दिवस रात्र मद्यपींच्या झिंगण्यामुळे भांडणांचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कोणाचाही धक नसल्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात परिसरातील रहिवाशांनी एकत्र येऊन एकलव्य प्रतिष्ठानचे प्रफुल्ल जांभुळकर यांची भेट घेऊन माहिती दिली.
मद्यपींच्या वाढलेल्या उच्छादामुळे भविष्यात येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असून वेळीच योग्य ती कारवाई करुन सहकार्य करावे असे प्रफुल्ल जांभुळकर यांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात वानवडीचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी महात्मा फुले सांस्कृतिक भवन व परिसरात पोलीसांची गस्त वाढवली असून भविष्यात कडक प्रतिबंधासह कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.