१ लाख किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत !
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
मुंबईतून तडीपार असलेल्या सराईत आरोपी सुरज चव्हाणला डोंबिवली पोलिसांनी अटक केली. आरोपी चोरीच्या उद्देशाने डोंबिवली ९० फुटी रोडवर आला होता.
त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात येताच गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलीस नाईक विशाल वाघ, पोलीस शिपाई निलेश पाटील यांनी त्याच्याकडे विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २ सॅमसंग मोबाईल आढळून आले.
पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता ५ मोबाईल फोन, एल.ई.डी. टी.व्ही, चांदीचे भांडे असे चोरी केलेले सामान त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. या सराईत गुन्हेगारांवर १६ गुन्हे असल्याचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्याकडून सांगण्यात आले.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता शनिवार पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पुढील तपास डोंबिवली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे करत आहे.