माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. ३ – भोर तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी पर्यायी मार्ग सुचविला असून यामुळे शासनाचे तब्बल २ हजार कोटी वाचणार आहे. यामुळे पर्यायी मार्गाबाबत संबंधित अधिकारी सकारात्मक असल्याने शिवगंगा खोऱ्यातील बागायती क्षेत्र वाचणार असल्याने शेतकऱ्यांची आशा उंचावली असल्याची माहिती रिंगरोड कृती समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे यांनी दिली आहे.
शिवगंगा खोऱ्यातून जाणाऱ्या पीएमआरडीए रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने आणि रिंगरोड कृती समितीच्या वतीने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची मागणीचे पत्र आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम मोपलवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिंगरोड कृती समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे, सचिव योगेश मांगले, बापू पोळेकर, जितेंद्र कोंडे, राजेंद्र धुमाळ, बापू जगताप, निलेश कोंढळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
भोर तालुक्यातील सात व हवेलीतील दोन गावे अशी एकूण नऊ गावे बाधित होत असून रिंगरोडबाबत पुनः सर्वेक्षण करणे, प्रस्तावित भूसंपादन हरकत असून रिंगरोडसाठी पर्यायी आखणी डोंगरपड माळरानावरून असावी तसेच रस्त्याची रुंदी कमी करणेबाबत मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.
श्यामसुंदर जायगुडे यांनी माहिती देताना सांगितले की, रिंगरोडमध्ये शिवगंगा खोऱ्यातील कल्याण ते केळवडेतील भागातील एकूण ६५० हेक्टर शेतजमीन बाधित होत असल्याने याला शेतकऱ्याचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी वाचविण्यासाठी आमदार संग्राम थोपटे हे देखील पाठपुरावा करत असून रिंगरोडच्या पर्यायी मार्गाच्या मागणीबाबत संबधित अधिकारी यांनी सकारात्मक सकारात्मकता दर्शविल्याने शेतकऱ्याची आशा पल्लवित होत असल्याचे माहिती जायगुडे यांनी दिली.