बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील बाबुर्डी येथील संजय पोमणे हे ते शेतकरी आहेत, ज्यांना काहीही कारण नसताना महावितरणच्या चुकींचा मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी त्यांच्या राहत्या घरासमोर महावितरणची वीजेची तार तुटली.. अख्खी गंज पेटून खाक झाली.. त्यातूनही महावितरणने चुका सुधारल्या नाहीत, यावर्षी पुन्हा तार तुटली..आणि गोठ्यातील दोन कालवडी जाग्यावर मृत झाल्या.. एकीकडे कोरोनाने छळले आणि दुसरीकडे वीजवितरणने पिडल्याने संजय पोमणे यांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत.
बाबुर्डी येथील संजय पोमणे यांच्या गोठ्यावर आज वीजवाहक तार कोसळून गोठ्यातील दोन कालवडी गतप्राण झाल्या. आज सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोठ्यावरून गेलेल्या वीजेच्या तारांना काही ठिकाणी जोडलेले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा ही तार तुटली. अनेकदा कळवूनही महावितरण यामध्ये बदल करीत नाही.
दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. मात्र बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी सांगितले की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली, तेव्हा हा खांब आधीचा की, गोठा आधीचा हा प्रश्न अभियंत्यांनी केला. खांब अगोदर येथे रोवलेला आहे आणि त्यानंतर गोठा बांधलेला आहे, त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवून उपयोग नाही. पंचनामा करून घ्यावा, त्यानंतर मदतीसंदर्भात पुढील कार्यवाही होईल असे त्यांनी सांगितल्याचे पोमणे म्हणाले.
दरम्यान बाबुर्डी येथे दरवर्षी कोठे ना कोठे वीजेच्या तारा, शॉर्टसर्किट होऊन घटना घडत आहेत. पाच महिन्यांपूर्वीच येथील एका मेंढपाळाच्या गोठ्यातील मेंढ्या व शेळ्या मृत झाल्या होत्या. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने शवविच्छेदन अहवालात श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे महावितरणकडून काहीच भरपाई मिळाली नाही, अथवा महावितरणने काहीच हालचाल केली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.