सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
तुम्हाला आठवतं का? काही वर्षांपूर्वी आपल्या गल्लीत किंवा गावात केसावर फुगे असे ओरडून सांगत भंगार व्यवसायिक किंवा सुया, बिबे, घरातील वस्तू विकणारे विक्रेते फिरायचे.. त्यावेळी घरातील महिला विंचरलेले केस आणून द्यायच्या आणि त्या बदल्यात फुगे किंवा काही वस्तू घ्यायच्या..! बदलत्या काळात केसाची फुग्याएवढी किंमत आता संपली असून केसाला सुद्धा सोन्याचा भाव आला आहे..!
इंदापूर तालुक्यात बेलवाडीत महिला बचत गटामार्फत केसांच्या खरेदीचा व्यवसाय सुरू करण्यात आला असून महिलांच्या केसाला साडेतीन हजार रुपये किलो असा भाव मिळू लागला आहे..!
काल बेलवाडी गावात ग्रामपंचायत व ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या माध्यमातून ब्लॅक गोल्ड केस संकलन केंद्र सुरू करण्यात आले. बेलवाडी गावात मयुरेश्वर बचत गटने केस संकलन केंद्र सुरू केले असून 3 हजार 500 रुपये किलोने महिलांचा केसाचा गुंता संकलित केले जात आहे. मयुरेश्वर बचत गट केस संकलन केंद्रावर पहिल्या दिवशी दिड किलो केसाचे संकलन करण्यात आले.
किशोर खोत व सुभाष खरेदी करणार आहेत. अनेक महिला केसाचा गुंता इकडे तिकडे फेकून देतात. किंवा साठवून नाममात्र किंमत देऊन भांडी घेतली जातात, पण आता याला चांगली किंमत मिळणार आहे . त्यामुळे महिलांनी आपल्या केसाचा गुंता फेकून न देता ते सोन्याप्रमाणेच जपून ठेवावेत.
बचत गटाने सुरू केलेल्या केंद्रामध्ये जमा करून त्याची किंमत घेऊन जावे, हा एक वेगळा अनुभव असून यातूनही काही महिलांना टाकाऊ चे पैसे मिळतील. तसेच केंद्र चालवणाऱ्या महिलांना रोजगार निर्माण होणार आहे.
या केसाचे पुढे काय होणार?
जमा केलेल्या केसांची प्रक्रिया करून केशरोपण तसेच सुशोभीकरणासाठी तसेच लिक्वीड बनवण्यासाठी हे केस निर्यात केले जातात. बाहेरील राज्यात अनेक व्यापारी खरेदी करीत आहेत. भविष्यात सर्व माहिती घेऊन आपणास शक्य झाल्यास अशा प्रक्रिया उद्योगासाठी विचार करणार आहोत असे ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी सांगितले. यावेळी बचत गटाचे समन्वयक बाळासाहेब नगरे, ग्रामसेवक मृगेन्द्र करचे, उप सरपंच स्वाती पवार, तात्यासो शेलार तसेच बचत गटाच्या सुरेखा शिंदे, सुरबला जामदार, मंजुश्री जामदार, अर्चना पवार, संजना जामदार, नीलम शेळके, आरती जाधव, मीनाक्षी शेळके, संगीता गोरे , मयुरी काशीद, संगीता पवार आदी सर्व उपस्थित होते.