सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी लावलेल्या सापळ्यात चोरटे शिताफीने सापडले
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या कित्येक दिवसांपासून सातारा पुणे, पुणे सातारा या महामार्गावर असणाऱ्या हॉटेल आणि ढाबे या ठिकाणी दिवसभर मालट्रक हाकून कंटाळलेले ट्रक चालक, मालक आणि क्लिनर हे मध्य रात्रीच्या दरम्यान कोणत्याही हॉटेल किंवा धाब्यांचा विश्रांतीसाठी आसरा घेवून थांबलेले असतात.
गाढ झोपेत असताना डिझेल चोरांची टोळी आलिशान महागड्या वाहनातून येवून उभ्या असलेल्या मालट्रकच्या डिझेल टाकीचे कटावणीच्या किंवा टॉमी च्या साहाय्याने कुलूप तोडून डिझेल टाकीमध्ये पाईप टाकून सायपण पद्धतीने डिझेल ची चोरी करीत असत.
या डिझेल चोरट्यांच्या टोळीने गेल्या कित्येक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. अनेक मला ट्रक चालक, मालक आणि क्लिनर यांनी भुईंजचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांचेकडे तक्रारी देखील केल्या होत्या.
या डिझेल चोरीच्या तक्रारींची गंभीर दाखल घेवून रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना ही टोळी सापडलीच पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. पण गेली कित्येक महिने पोलिसांच्या हातावर तुरी देवून ही चलाख टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती.
त्यामुळे आशिष कांबळे हे अस्वस्थ झाले होते. स्वतः त्यांनी अनेक वेळा ही टोळी पकडण्यासाठी रात्र गस्तीवर फिरत होते. तरी देखील ही टोळी गुंगारा देवून पलायन करतच होती. काल दिनांक 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री आशिष कांबळे यांनी सातारा पुणे महामार्गावरील हॉटेल आसरा या ठिकाणी वेळे ग्रामस्थांच्या मदतीने रात्री बारा नंतर सापळा लावला होता.
याच दरम्यान लावलेल्या सापळ्यात आसरा हॉटेल येथे उभ्या असलेल्या आयशर टेम्पो मधून डिझेल चोरी करून ते कॅन मध्ये भरत असताना या टोळीवर रात्र गस्तीवर असणारे हवालदार चंद्रकांत मुंगसे, दत्तात्रय धायगुडे, कोळपे, वाहन चालक वाघ, धुमाळ, दशरथ पवार, मिलिंद पवार व त्यांचे सहकारी यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या टोळीवर झडप घातली असता, एक आरोपी पकडण्यात या पोलीस पथकाला व वेळे ग्रामस्थांना यश आले. पण या डिझेल टोळीपैकी अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनास्थळावर सापडलेला एक मोबाईल आणि पकडलेला एक आरोपी याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने पळून गेलेल्या सहकाऱ्यांची नावे आशिष कांबळे यांना सांगितली आहेत. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली.
त्यांचेकडून अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीचे साडेतीनशे लिटर डिझेलने भरलेले कॅन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी वाहनचालक झोपलेले असताना मध्यरात्री गेली कित्येक दिवस चोरीचा व्यवसाय करत असल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने दिली.
एखाद्या ट्रकचालक, मालक किंवा क्लिनर डिझेल चोरी करत असताना जागा झाला, तर ही टोळी त्यांना काठी आणि टॉमी च्या साहाय्याने जबर मारहाण करत असे. अशीही माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी महामार्गावर चोरीचा हैदोस घालत असलेल्या या डिझेल चोर टोळीला गजाआड केल्याने वाहनचालक, मालक आणि क्लिनर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.