महान्यूज वेदर रिपोर्ट
यावर्षी मोसमी पाऊस सरासरीपेक्षा एकशे दहा टक्क्यांनी पडेल असे सुरुवातीस केलेले भाकित आणि खरोखरच वेळेत आलेला पाऊस यामुळे बळीराजा सुखावला होता. परंतु आरंभशूर पावसाने या वर्षी निराशा केली. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती, परंतु ऑगस्ट मध्ये देखील पावसाने निराशा केली आहे. आता सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पाऊस जास्त पडेल असे सांगितले जात आहे..
पुढील तीन-चार दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होईल आणि दिमाखात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पुढील चार-पाच दिवसात पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होईल आणि अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे नंदुरबार, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, धुळे, ठाणे, रायगड, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे; तर पुणे आणि मुंबईत अंशतः ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.