कल्याणात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला गर्दी झाली अन पोलिसांनी सील केला हॉल..!
ना मास्क ,सोशल डिस्टसिंगचा विसर , व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल..!
अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह
निमित्त कृष्णजन्माष्टमीच… गाणं फाल्गुनी पाठकचं… धिंगाणा स्थानिकांचा.. आणि दणका कल्याण-डोंबिवली महापालिकेचा.. असं काहीसं चित्र काल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत दिसले, जेव्हा फाल्गुनी पाठकच्या रंगात आलेल्या गाण्यांनी साऱ्या सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला आणि मग पालिकेने कल्याणच्या पश्चिमेकडील बँक्वेट हॉल सील केला..!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणमधील चार व्यावसायिकांनी काल कल्याण पश्चिमेकडील सॉलिटर बेंक्विट हॉलमध्ये संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आल्या होत्या.
या कार्यक्रमात गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण, तरुणींनी गर्दी केली होती. गर्दी बरोबरच गाणी सुरू होताच जमलेल्या लोकांना, ना मास्कचे भान राहिले, ना सोशल डिस्टसिंगचे..! साऱ्या कोरोना नियमांची पायममल्ली या कार्यक्रमात झाल्याचे दिसून आली.
या कार्यक्रमाचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मग मात्र पालिका खडबडून जागी झाली आणि कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सॉलिटीआर हॉल सील करण्याची कारवाई केली.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली असली तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अर्थ व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लोकडाऊनमधील निर्बध शिथिल केले आहेत, मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नागरिकाना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले होते. मात्र त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेफिकिरी या कार्यक्रमात दिसून आली.