इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या वरील भिगवन ते हिंगणगाव दरम्यान असणाऱ्या जवळपास 55 किलोमीटर महामार्गावरील रस्ते सफाई, झाडलोट साफसफाई, झाडांचे व्यवस्थापन, पाणी देणे गेली सहा महिन्यापासून बंद आहे.
महामार्गावरील हिंगणगाव येथील सार्वजनिक शौचालय तर गेली काही वर्षापासून बंद आहे. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या वाहनातून वाळू मुरुम खडी पडत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. सदरचे काम एका कंपनीला देण्यात आले असून महामार्गाचे अधिकारी व कंपनीचे ठेकेदार यांच्या संगनमताने या महामार्गावर पूर्णतः दुर्लक्ष झाल्याची दिसत असून शासनाच्या तिजोरीवर गेल्या दोन वर्षांपासून डल्ला मारला जात आहे.
रस्त्यावर वाहणाऱ्या वाहनातून वाळू, मुरुम, खडी पडत असल्याने अनेक अपघात झाले आहेत असा आरोप होत असून या अपघातांची जबाबदारी संबंधित कंपनीवर ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. सदर कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा शिवशाही शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर पासून शासकीय वेळेत इंदापूर तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन आरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच महामार्ग व संबंधित सर्व विभागांना पाठवण्यात आलेल्या आहेत. आरडे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ या मार्गावरील भिगवण ते हिंगणगाव रस्ता कि.मी.९५ ते.की.मी.१५० दरम्यानचा हायवे रस्ता साफ सफाई, झाडलोट, साईटपट्या देखभाल दुरूस्ती, डिव्हायडर मधील झाडांना पाणी घालणे व हायवे रोडलगतची सार्वजनिक शौचालये व मुतार्याद स्वच्छता व त्या ठिकाणी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या कामाचा ठेका केडगाव चौफुला येथील कंपनीकडे आहे.
सदर कंपनीला काम न करताच संबधीत विभाग अधिका-यांकडून प्रत्येक महिन्याला बीले अदा करण्यात येत आहेत. यामध्ये महामार्ग प्रशासन अधिकारी व संबधीत काम घेणार कंपनी ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने गेल्या दोन वर्षापासुन शासनाच्या तीजोरीवर डल्ला मारण्याचे काम चालू असल्याचा आरोप आरडे यांनी केला आहे.
महामार्ग क्रमांक ६५ वरील रस्ते सफाई करणे झाड झुडपांचे व्यवस्थापन करणे झाडांना पाणी देणे, रस्त्याची झाडलोट करणे साफसफाई करणे इत्यादी कामे ही गेल्या ६ महिन्यापासून बंद आहेत. हिंगणगाव येथील शौचालय गेल्या ३ – ४ वर्षापासून बंद आहे. त्यालाही एक कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
सदर प्रकरणी शासनाची फसवणूक करून काम न करता पैसे वसूल करणारी ठेकेदार कपनी व त्यांना बीले अदा करणारे अधिकारी यांचेवर प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई होणे आवश्यक आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.