माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १ – ‘आरोग्य कर्मचारी तत्पर सेवा बजावत असल्याने भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यापासून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून युवा वर्गाचाही लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी केले आहे.
भोंगवली ( ता. भोर ) गणातील नागरिकाचे यशस्वी महालसीकरण पार पडल्याबाबत भोर तालुका कॉग्रेसच्या वतीने आरोग्य अधिकारी, कर्मचारी व आशासेविका यांचे प्रातनिधिक सत्कारप्रसंगी रोहन बाठे बोलत होते.
यावेळी बारामती विभाग युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेश धाडवे, मच्छिंद्र धाडवे, न्हावी ३२२ चे सरपंच गणेश सोनवणे, विश्वास हिंगे, आरोग्य अधिकारी डॉ. सुदर्शन मलाजुरे, सिध्देश्वर कराळे, आबा बोरगे, भरत भोसले, भोंगवली केंद्राचे आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भोंगवली गणात काल एका दिवसात एकूण २ हजार ४५१ लसीकरण पार पडले आहे. तसेच तालुक्यात लसीकरणात भोंगवली आरोग्य केंद्र अग्रेसर असून आतापर्यंत ४५ वयाच्या पुढील जवळपास ९५ टक्के लसीकरण झाले.
१८ वर्षापुढील युवा वर्गाचे पहिला डोस ८० टक्केहून अधिक लसीकरण झाले असल्याची पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी दिली असून भोर तालुक्यात ९ हजार ८६९ नागरिकांनी लस घेतली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.