राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांच्या साखर विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. भांबरे यांनी चार दिवस अर्थात २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिलेल्या तक्रारीनुसार बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. साखर विक्री संदर्भाने हा प्रकार घडला आहे.
प्राप्त माहितीनुसार तामिळनाडु येथील चेन्नईमध्ये राहणारा प्रदीपराज चंद्राबाबू (43) आणि रुही ता. अहमदनगर येथील अभिजित वसंतराव देशमुख या दोघांना नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. अभिजित देशमुखची पोलीस कोठडी आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे.
अभिजित देशमुख मागील सात दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आज अभिजित देशमुखसह प्रदीपराज चंद्राबाबू आणि इंडिगा मणी उर्फ मुन्नी कांता रा. गंगानगर आनंदपूर आंध्र प्रदेश अशा तिघांना मदखेड न्यायालयात हजर करून देशमुखची पोलीस कोठडी वाढवून देण्याची आणि प्रदीपराज आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ऍड. जे. एन. वडेर यांच्या वतीने केली. न्या. भामरे यांनी अभिजित देशमुख याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.