अॅड. तुषार झेंडे पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परीषद
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादनातील कंपनी आहे. मात्र या कंपनीने डिलर्सकडून ग्राहकांना डिस्काऊंट देण्याबाबत रोखल्याचा आरोप एका डिलरनेच केल्यानंतर सीसीआयने यात लक्ष घातले आणि कंपनीला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे.
हा देशातील इतरही वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना मोठा धक्का आहे. कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) या संस्थेने डिलर डिस्काउंट पॉलिसी अंतर्गत कंपनीला २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये एका डिलरने सीसीआय कडे तक्रार केली होती.
मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीतील माहिती सीसीआयने घेतली. एका डिलरने जी तक्रार ई मेलद्वारे केली होती. त्याची गांभिर्याने दखल सीसीआय ने घेतली आणि तपास केला. यामध्ये ग्राहकांना वाहनाच्या संदर्भात अधिक डिस्काऊंट देण्यापासून रोखले जाते असा आरोप होता. ज्यामध्ये मोठ्या डिलरच्या हिताचे जाणीवपूर्वक संरक्षण केले जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे सीसीआयने मारुती सुझुकीवर ठपका ठेवत हा २०० कोटींचा दंड केला व तो ६० दिवसांत भरण्याचे आदेश दिले.
ही तक्रार चार वर्षांपूर्वीची होती. मात्र आता सीसीआयने यातील निकाल दिला. फक्त निकालच दिला नाही, तर डिलर सवलतींशी संबंधित अँटी कम्पिटिटीव्ह प्रॅक्टिस करण्यासही सीसीआयने मारुती सुझुकीला निर्देश दिले. आता केलेला हा दंड कंपनीला दोन महिन्यांच्या आत भरावा लागणार आहे. मारुती सुझुकीने अशा प्रकारचे हेराफेरीचे काम बंद करावे असेही निर्देश सीसीआयने दिले आहेत.